तपासासाठी गेलेल्या पोलिसांनी प्रवेशद्वारावर चालवला बुलडोझर
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. इम्रान शनिवारी इस्लामाबाद न्यायालयात हजर झाले, मात्र त्याच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात गोंधळ घातला. याचदरम्यान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी या प्रकरणाची सुनावणी 30 मार्चपर्यंत तहकूब केली. तसेच माजी पंतप्रधानांविरुद्ध जारी केलेले अटक वॉरंटही त्यांनी रद्द केले. अशा वातावरणात सुनावणी घेणे शक्मय नसल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.
इम्रान खान शनिवारी सकाळी इस्लामाबादला रवाना झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या जमान पार्कमधील निवासावर छापा टाकला. पोलिसांनी बुलडोझरच्या सहाय्याने प्रवेशद्वाराचे गेट तोडून इम्रानच्या घरात प्रवेश केला. सुमारे अडीच तास घराची झडती घेतल्यानंतर पोलीस परतले.
इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी शनिवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी आपल्या अटकेची भीती व्यक्त केली होती. जर मला अटक झाली, तर पक्षाचे कामकाज हाताळण्यासाठी मी एक समिती तयार केली असल्याचेही सांगितले. मात्र, त्यांनी समितीत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
इम्रान खान यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पक्षाचे हजारो रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी सरकारविरोधी जोरदार रणनीती आखत इम्रान यांना अटक झाल्यास प्रचंड उलथापालथ घडवण्याचे नियोजन केले आहे. याच आंदोलनादरम्यान पोलिसांनी इम्रानचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) 40 कार्यकर्त्यांना हिंसाचार पसरवण्याच्या आणि कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप केल्याच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्यावर लाठीचार्जही करण्यात आला. दरम्यान, पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटीने इस्लामाबादमधील न्यायिक संकुलात सुरू असलेल्या गोंधळाच्या मीडिया कव्हरेजवर बंदी घातली होती.