वृत्तसंस्था/ लंडन
ओल्डट्रफोर्ड मैदानावर रविवारी झालेल्या प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात मँचेस्टर युनायटेड क्लबने अर्सेनलचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून या स्पर्धेत त्यांनी आपला सलग चौथा विजय नोंदविला. या सामन्यात मँचेस्टर युनायटेडतर्फे मार्कस रॅशफोर्डने 2 गोल केले.
या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. पण मध्यंतरापूर्वी रॅशफोर्डने नोंदविलेल्या दोन गोलांमुळे अर्सेनलला पिछाडीवर रहावे लागले. मँचेस्टर युनायटेडचा आणखी एक गोल पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱया अँटोनीने केला होता. तत्पूर्वी अर्सेनलचे खाते बुकायो सेकाने उघडले होते. या स्पर्धेत गुणतक्त्यात अर्सेनलचा संघ 15 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या सामन्यापूर्वी अर्सेनलने पाच सामने जिंकून आघाडी घेतली होती. रविवारच्या सामन्यात अर्सेनलच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. अर्सेनलने आपले खाते 12 व्या मिनिटाला उघडल्यानंतर रॅशफोर्डने मध्यंतरापर्यंत 2 गोल नोंदवून अर्सेनलवर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात मँचेस्टर युनायटेडचा आणखी एक गोल अँटोनीने केला. पण अर्सेनलला या सत्रामध्ये शेवटपर्यंत गोल नोंदविता आला नाही.