अध्यक्ष अरुणकुमार डोंगळेही अजित पवारांसोबत; शहरात झळकले शुभेच्छा फलक
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यात झालेल्या दूसऱ्या राजकीय भुकंपामध्ये ‘गोकुळ’चे नेते आमदार हसन मुश्रीफ अजित पवार यांच्यासोबत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनीही उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांची तर आमदार मुश्रीफ यांची मंत्री पदी निवड झाल्याबद्दल शहरात शुभेच्छा फलक उभारत त्यांची भुमिकाच स्पष्ट केली. आमदार मुश्रीफांचा सत्तेतील सहभाग आणि गोकुळचे अध्यक्ष यांनी उभारलेला शुभेच्छा फलक यामुळे आता गोकुळचे लेखापरीक्षणाचे पुढे काय होणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर येवून गेले. यावेळी त्यांनी गोकुळच्या कारभारात अनियमितता आढळली असून याबाबत गोकुळ प्रशासनाकडे खुलासे मागविले आहेत. हि अनियमितता स्पष्ट झाल्यास गोकुळवर कारवाई करणार असल्याची स्पष्टोक्ती मंत्री विखे-पाटील यांनी दिली होती. मंत्री विखे-पाटील यांच्या या वक्तव्यानंतर गोकुळवर प्रशासक येणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरु झाली. तर गोकुळचे नेते, संचालक यांचे टेन्शनमध्ये वाढ झाली होती.
गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळमधील कारभारात अनियमितता असल्याच्या तक्रारी दुग्धविकास विभागाकडे केल्या आहेत. महाडिक यांच्या तक्रारीनुसार गोकुळचे लेखापरीक्षण सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके हे गोकुळच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील या नेत्यांकडून लेखापरिक्षण थांबवले जाईल असा समज होता. त्यात लेखापरीक्षणाचा अहवालही लांबल्याने यामधून काही सिद्ध होणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या दुग्धविकास मंत्री यांच्या वक्तव्यानंतर गोकुळवर कारवाई होणार असे स्पष्ट होत असताना आता आमदार मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथीने भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने गोकुळच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळाली आहे. लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात असताना आता गोकुळवर कारवाई होणार की नाही याबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरु आहे.