10 दिवसांच्या विपश्यना शिबिरासाठी रवाना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बुधवारी विपश्यना शिबिरासाठी रवाना झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री 10 दिवसीय विपश्यना शिबिरात सामील होणार आहेत. खास बाब म्हणजे ईडीने दिल्लीतील अबकारी घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना 21 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
केजरीवाल हे बुधवारी दुपारी पंजाबमधील विपश्यना शिबिरासाठी रवाना झाले आहेत. ईडीच्या समन्सवर आम्ही कायदेशीरदृष्ट्या योग्य पाऊल उचलू असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
केजरीवालांचा विपश्यना शिबिरात जाण्याचा कार्यक्रम पूर्वनिर्धारित होता. केजरीवाल हे नियमित स्वरुपात या ध्यानधारणा शिबिरासाठी जात असतात असा दावा आप राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी केला आहे. ईडीने केजरीवालांना चौकशीसाठी दुसऱ्यांदा समन्स बजावला होता. यापूर्वी केजरीवालांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील अबकारी घोटाळ्याप्रकरणी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु या समन्सला अवैध संबोधून केजरीवालांनी ईडीसमोर हजर राहणे टाळले होते.