वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एटीपी टेनिसच्या इतिहासामध्ये तब्बल 20 वर्षानंतर पुरुषांची एटीपी टेनिस स्पर्धा पहिल्यांदाच हाँगकाँगमध्ये भरवली जाणार आहे. या स्पर्धेच्या यजमान पदासाठी हाँगकाँगला 20 वर्षांचा कालावधीची वाट पाहावी लागली आहे.
एटीपी टूरवरील स्पर्धा हाँगकाँगमध्ये 31 डिसेंबर ते 7 जानेवारी 2024 या दरम्यान होणार आहे. सदर स्पर्धा हार्डकोर्टवर खेळवली जाईल. यापूर्वी हाँगकाँगमध्ये शेवटची एटीपी स्पर्धा 2002 साली भरवण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये अमेरिकेचे पीट सांप्रास, आंद्रे अॅगासी, जर्मनीचा बोरीस बेकर, आणि मायकेल चँग यांचा समावेश होता. हाँगकाँगमध्ये होणाऱ्या या आगामी एटीपी टेनिस स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस रकमेत वाढ करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे हाँगकाँगमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात डब्ल्यूटीए टूरवरील महिलांची टेनिस स्पर्धा भरवली जात आहे. 2018 नंतर महिलांची ही टेनिस स्पर्धा हाँगकाँगमध्ये होत आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोना समस्येमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला होता. आता चीनमध्ये संथगतीने आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेचे पुनरागमन होत असल्याचे दिसून येते.