शिख मुलीचे अपहरण ः धर्मांतर करत बळजबरीने विवाह ः हिंदू कर्मचाऱयाला जमावाची मारहाण
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू अन् शिखांवरील अत्याचार सुरूच आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतात शीखधर्मीय मुलगी दीना कौरचे अपहरण करत तिचे धर्मांतर करत बळजबरीने मुस्लीमधर्मीयाशी विवाह लावून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे एका हिंदू सफाई कर्मचाऱयावर ईशनिंदेचा आरोप करत त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे.
दीना कौरच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिसांकडे मदत मागितली असता पोलीस अधिकाऱयांनी तक्रार देखील नोंदवून घेण्यास नकार दिला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात राहणारे गुरबचन सिंह यांची मुलगी दीना कौर ही शिक्षिका आहे. शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यावर तिला वाटेत रोखून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिचे धर्मांतर करत बळजबरीने विवाह लावून देण्यात आला.
माझ्या मुलीचे अपहरण इंतजामियाकडुन करण्यात आले आहे. मुलीचे बळजबरीने धर्मांतर करत तिचा विवाह करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तसेच प्रशासनाकडे दाद मागितली परंतु कुणीच याकडे लक्ष दिले नाही. न्याय मिळेपर्यंत आम्ही रस्त्यांवर निदर्शने करत राहू असे गुरबचन सिंह यांनी म्हटले आहे.
विदेश मंत्रालयाला आवाहन
या प्रकरणाचे पडसाद आता भारतातही उमटत आहे. भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी या पूर्ण घटनेची निंदा करत पाकिस्तानात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. एक शीख कुटुंब न्यायासाठी रस्त्यांवर आंदोलन करत आहे. भारत, पूर्ण शीख समुदाय अन् भारत सरकार या अवघडक्षणी पीडित कुटुंबासोबत उभे आहे. या मुद्दय़ावर भारताचे विदेशमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पाकिस्तान सरकारला जाब विचारण्या सांगणार असल्याचे सिरसा यांनी म्हटले आहे.
ईशनिंदेचा आरोप, जबर मारहाण
पाकिस्तानात एका हिंदू सफाई कर्मचाऱयाला कथित ईशनिंदेच्या आरोपाप्रकरणी जबर मारहाण करण्यात आली आहे. या कर्मचारी या मारहाणीत मृत्युमुखी पडला असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. तर काही वृत्तांमध्ये या कर्मचारी वाचल्याचे म्हटले गेले आहे. पीडित व्यक्तीचे नाव अशोक कुमार आहे. पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये हिंदू सफाई कर्मचारी अशोक कुमारचे दुकानदार बिलाल अब्बासीसोबत भांडण झाले होते. या दुकानदारानेच ईशनिंदेचा आरोप केला होता. प्रत्यक्षात एका मुस्लीम महिलेनेच एका धार्मिक ग्रंथाला आग लावली होती.