आंदोलनाला पाठिंबा दिल्याने खानापूर पोलिसांकडून गुन्हा नेंद
खानापूर : नगरपंचायतीच्या सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्ते पंडित ओगले यांनी मुख्याधिकाऱ्यांना आमदार विठ्ठल हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यासह उपस्थित नागरिकांसमोर मुख्याधिकारी राजू वठारे यांना जाब विचारला होता. याचा मनात राग धरुन मुख्याधिकारी वठारे यांनी भाजप कार्यकर्ते पंडित ओगले यांच्यावर अॅट्रासिटी फिर्याद दाखल केली. खानापूर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षकानी पंडित ओगले यांच्यावर फिर्यादीनुसार अॅट्रासिटीसह इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
गुरुवारी दुपारपासून खानापूर नगरपंचायतीच्या सफाई कामगारांनी आपल्या थकीत वेतनासाठी आणि मुख्याधिकारी राजू वठारे यांच्या उद्धट वर्तनाविरोधात आंदोलन छेडले होते. शुक्रवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नगरपंचायतीला टाळे ठोकल्याने आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह विविध संघ-संघटनांचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे नेतेमंडळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगरपंचायतीच्या आवारात जमले होते. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्याधिकारी वठारे यांच्याशी चर्चा करताना अनेक नागरिकांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वठारे यांच्या वर्तनाबद्दल पाढाच वाचण्यास सुरवात केला होता. यावेळी तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, पंडित ओगले यांनीही वठारे यांच्या उद्धटपणाबद्दल तक्रारी सांगितल्या होत्या. यावेळी वठारे आणि संजय कुबल, पंडित ओगले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. यावेळी उपस्थितांनी वठारे यांना शांत करून पुढील रजेची कारवाई पूर्ण केली होती. वठारे यांनी हा राग मनात धरुन दुपारी तीननंतर पोलीस स्थानकात पंडित ओगले यांच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद दाखल केली आहे.
या फिर्यादीनुसार खानापूर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक गिरीश एम. यांनी कलम 353, 504, 506 यासह 3 (1), (आर), 3, (1), 3 (2), (व्ही-ए) यासह अॅट्रासिटी कलमाअंतर्गत पंडित ओगले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली असून याबाबत खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नायक यांना विचारले असता त्यांनी पंडित ओगले यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.