पाटणा-गया मार्गावर दगडफेक ः 3-4 वाहनांच्या काचा फोडल्या
पाटणा / वृत्तसंस्था
पाटणा येथे रविवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने या हल्ल्यावेळी ताफ्यासमवेत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. या हल्ल्यात जमावाने 3-4 वाहनांच्या काचा फोडल्या. यावेळी गाडीत उपस्थित असलेले तिघेही जखमी झाले. ही घटना गौरीचक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोहगी गावाजवळ घडली. सोमवारी मुख्यमंत्री गया येथे जाणार असून, तेथे दुष्काळावर बैठक आणि रबर डॅमची पाहणी होणार आहे. याच कारणावरून त्यांच्या सुरक्षेतील वाहनांचा ताफा गयाच्या दिशेने जात असताना दगडफेक करण्यात आली. या भागातील एक तरुण दोन आठवडय़ांपासून बेपत्ता झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोहगी गावात रास्तारोको केला होता. आंदोलनामुळे पाटणा-गया एसएच-1 वर वाहतूक विस्कळीत झाली होती. याचदरम्यान नितीशकुमारांच्या ताफ्यातील वाहने लक्ष्य करण्यात आली. दगडफेकीत काही गाडय़ांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने ताफ्यामध्ये कोणतेही व्हीआयपी उपस्थित नव्हते.