प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग येथील बेळगाव फौंड्री क्लस्टर येथे शुक्रवारी कारखाना परवाना, अनुपालन आणि कायदेशीर संस्थांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी कारखाने आणि बॉयलर विभाग, बेळगाव यांच्यावतीने जागरुकता कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी बोलताना फॅक्टरी इन्स्पेक्टर जगदीश राठोड म्हणाले की, कामगारांची संख्या दहापेक्षा अधिक असलेला कोणताही कारखाना व उद्योगासाठी कारखाना परवाना आवश्यक आहे. कारखाना व उद्योग परवाना काढणे बंधनकारक असून ते मालक व कामगारांच्या हिताचे आहे. नुकताच हुबळी येथे वाढदिवसासाठी लागणाऱया मेणबत्ती कारखान्यात दुर्घटना होऊन सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. या कारखान्याकडे कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून फॅक्टरी कारखाना व मशीन शॉपसाठी दहापेक्षा जास्त कामगार असणाऱया उद्योगाचे मालक यांनी कारखाना परवाना घेऊन सहकार्य करावे. यासाठी कोणतीही मदत लागली तर आपण ती तात्काळ करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
सध्या ज्यांनी कारखाना परवाना घेतला आहे त्यांनी ऑनलाईनद्वारे आपले वार्षिक परवाना नूतनीकरण, कामगारांची संख्या वाढविण्यासाठी व पत्ता बदलण्यासाठी माहिती आपण आपल्या ऑफीसमधूनच करू शकता. यासाठी संबंधित वेबसाईटवर किंवा कारखाने आणि बॉयलर विभाग, शाहूनगर-बेळगाव कार्यालयात भेट देऊ शकता.
या कार्यक्रमाला सहदेव बनसोडे व उद्यमबागमधील फौंड्री व मशीन शॉपचे मालक व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.