बोर्डाची मंजुरी मिळाली : अंतिम निर्णयासाठी कंपनी घेणार भागधारकांसोबत बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बजाजची सहयोगी कंपनी बजाज फायनान्स 10 हजार कोटी उभारत आहे. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे 8,800 कोटी आणि परिवर्तनीय वॉरंटद्वारे 1,200 कोटी रुपये कंपनीकडून उभारले जातील. कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की त्यांना यासाठी बोर्डाची मंजुरी मिळाली आहे. आता अंतिम निर्णयासाठी कंपनी आपल्या भागधारकांची बैठक घेणार आहे.
बजाज फायनान्सने सांगितले की कंपनी आपल्या प्रवर्तक बजाज फिनसर्व्हला प्राधान्य इश्यू म्हणून 15,50,000 वॉरंट जारी करेल. वॉरंट वाटपाच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या आत शेअर्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. बजाज फिनसर्व्हकडे 31,78,16,130 शेअर्सच्या बदल्यात बजाज फायनान्समध्ये 52.45टक्के हिस्सा आहे जो वॉरंट रूपांतरणानंतर 52.57 टक्के पर्यंत वाढेल. वॉरंटचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा पर्याय वापरला नसल्यास, वॉरंट संपुष्टात येतील. ही बातमी समोर आल्यानंतर, बजाज फायनान्सचे शेअर्स गुरुवारी 9.05 रुपयांनी किंवा 0.12 टक्क्यांनी घसरून 7,845 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, बजाज फिनसर्व्हचे शेअर्स 11.45 रुपये किंवा 0.75 टक्के वाढले. कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसशी स्पर्धा करण्यासाठी हे करत आहे. जिओ फायनान्स सध्या मुख्य बाजारपेठेत सूचीबद्ध आहे.
तिमाहीत नफा 32 टक्के वाढला
पहिल्या तिमाहीत कंपनीला 32टक्के नफा झाला आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, बजाज फायनान्सने एकत्रित आधारावर 3,437 कोटींचा नफा कमावला आहे. हा आकडा 2022 च्या पहिल्या तिमाहीपेक्षा 32 टकके अधिक आहे. कंपनीचे शुद्ध व्याज उत्पन्न देखील वर्ष-दर-वर्ष आधारावर 26 टक्क्यांनी वाढून 8,398 कोटी झाले आहे.