भारतीय रिझर्व्ह बँकेचा हिरवा कंदिल : परदेशात प्रवास करणाऱ्यांना होणार लाभ
वृत्तसंस्था/ मुंबई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने बँकांना ‘रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड’ सादर करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांना पेमेंटचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8 जून (गुरुवार) रोजी याबाबत माहिती दिली.
फॉरेक्स कार्ड आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरले जाऊ शकते.फॉरेक्स कार्ड एटीएम, पीओएस मशीन आणि परदेशातील ऑनलाईन ट्रेडर्सना वापरता येऊ शकते. या शिवाय बँका विदेशी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड जारी करू शकतील. ज्याचा भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर वापर करता येईल.
गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, परदेशात बँकांकडून सादर केलेल्या रुपे डेबिट आणि क्रेडिट कार्डची स्वीकार्यता वाढत आहे. आता मध्यवर्ती बँकेने बँकांना रुपया प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.फॉरेक्स कार्ड्स क्रॉस-बॉर्डर व्यवहारांसाठी एक सोपा पर्याय देतात.
एफआरएसमधील डेव्हलपमेंट बँकिंग आणि पेमेंट्सच्या भारत प्रमुख राजश्री रेंगन यांनी सांगितले की, बँकांना रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड सादर करण्याची परवानगी दिल्याने क्रॉस-बॉर्डर व्यवहारांसाठी एक सोपा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले असून यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात गुंतलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात सोय होईल. यामुळे परदेशात जाणाऱ्या लोकांचीही मोठी सोय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड एटीएम, पीओएस मशीनसह अन्य ठिकाणी वापर
बँक बझार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी म्हणाले की, विदेशी अधिकारक्षेत्रात रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड असल्याने पेमेंट पर्यायाला आणखी बळकटी मिळेल.
पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत, आरबीआय आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांना सुरक्षित इलेक्ट्रॉनिक पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम स्थापित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. रुपे कार्ड लाँच करण्याचा उद्देश डिजिटल पेमेंट आणि आर्थिक वाढीला चालना देताना एक स्वयं-शाश्वत वित्तीय प्रणाली तयार करणे हा होता.
रुपेने गेल्या सात वर्षांत अनेक प्रकारची कार्डे सादर केली
रुपेने ने गेल्या सात वर्षांत अनेक कार्डे जारी केली आहेत. हे लोकांच्या विविध गरजा पूर्ण करतात. सरकारी योजनांसाठी विशेष कार्डांव्यतिरिक्त, रूपे क्लासिक, प्लॅटिनम आणि निवडक व्हेरियंट कार्ड सामान्य आणि श्रीमंत लोकांना लक्षात घेऊन डिझाइन केले आहेत.
शेट्टी म्हणाले की, भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन रुपे कार्डची रचना करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत हे कार्ड स्वीकारण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. परदेशातही अनेक ठिकाणी ते स्वीकारले जात असल्याचेही स्पष्टीकरण यावेळी दिले आहे.