वृत्तसंस्था/ कोलकाता
गुरुवारी ईडन गार्डन स्टेडियमवर केकेआर व राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने कोलकाताचा 9 गडी राखून पराभव केला. राजस्थानच्या विजयाची हिरो ठरला यशस्वी जैस्वाल. त्याने 47 चेंडूत 98 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर युजवेंद्र चहलनेही 4 विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान संघाचा प्रमुख खेळाडू जोस बटलरला खातेही उघडता आले नाही. अशात सामना संपल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला आहे. कारण त्याला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. वास्तविक, जोस बटलरला आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या अंतर्गत त्याला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. जोस बटलर धावबाद झाल्यानंतर तंबूत परत असताना नाराज दिसला. त्यानंतर बटलरने रागात आपली बॅट सीमारेषवर आपटली. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सामनाधिकारी यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. ज्यामुळे जोसने आपला गुन्हा मान्य केला आहे. सामन्यानंतर आयपीएल कमिटीने सोशल मीडियाद्वारे बटलरला दंड ठोठावल्याची माहिती दिली.