सकाळच्या सत्रात दोन बसेस : भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
वाडी रत्नागिरी येथील श्रीक्षेत्र जोतिबा देवाची चैत्र यात्रा दि. 3 ते 5 एप्रिल दरम्यान होणार आहे. या यात्रेसाठी बेळगाव परिसरातून हजारो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल होणार आहेत. यासाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळच्या सत्रात बेळगाव-जोतिबा मार्गावर दोन बस धावणार आहेत.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बससेवा सुरळीत सुरू ठेवली जाणार आहे. शिवाय भक्तांची संख्या वाढल्यास बसफेऱ्या वाढवल्या जाणार आहेत, अशी माहिती परिवहनने दिली आहे. श्रीक्षेत्र जोतिबाच्या यात्रेला महाराष्ट्रासह बेळगाव, खानापूर, चंदगड परिसरातून हजारो भाविक जाणार आहेत. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 8 आणि 9 वाजता कोल्हापूर जोतिबाकडे दोन बसेस धावणार आहेत. याबरोबरच बेळगाव-कोल्हापूर विनाथांबा बस धावत आहेत. दर अर्ध्या तासाला ही बससेवा सुरू आहे.
कोल्हापूर येथील बसस्थानकातूनदेखील जोतिबाला विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. बेळगाव येथून कोल्हापूर आणि कोल्हापूर येथून जोतिबाला प्रवास करता येणार आहे. कोल्हापूर येथील बसस्थानकातून दर 15 मिनिटांनी जोतिबाकडे बसेस धावणार आहेत.