वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी येथे ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियम आणि जर्मनी यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. सुवर्णपदकासाठी होणाऱया या लढतीला रविवारी सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होईल. तसेच रविवारी दुपारी 4.30 वाजता ऑस्ट्रेलिया आणि हॉलंड यांच्यात कांस्यपदकासाठी सामना खेळविला जाणार आहे.
पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत तीन संघांना जेतेपद राखता आले आहे. दरम्यान, या स्पर्धेतील विद्यमान विजेता बेल्जियमचा संघ यावेळी असा पराक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण जर्मनीकडून त्याला कडवा प्रतिकार होऊ शकेल.
या स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांनी पाठोपाठ दोन वेळा अजिंक्यपदे मिळवली आहेत. दरम्यान, गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत जागतिक हॉकी क्षेत्रामध्ये बेल्जियमने दर्जेदार कामगिरी करत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2018 साली बेल्जियमने भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर विश्वचषक हॉकी स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. बेल्जियम संघातील 11 खेळाडू 30 वर्षावरील आहेत. तसेच 3 खेळाडू 35 वर्षावरील आहेत. बेल्जियमच्या नवोदित हॉकीपटूंनी जगातील इतर अनेक बलाढय़ देशांना आपल्या कामगिरीने चकित केले आहे. 2018 साली विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱया बेल्जियमने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. बेल्जियम संघातील खेळाडू आपल्या अनुभवाच्या तसेच परिपूर्ण तंदुरुस्तीच्या जोरावर हे यश संपादन करीत आहेत. बेल्जियम संघामध्ये व्हिन्सेंट व्हॅनेश हा जागतिक दर्जाचा एक सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून ओळखला जातो. भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या या प्रति÷sच्या स्पर्धेत बेल्जियम संघाने आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यावर 18 गोल नोंदविले आहेत. त्यामध्ये या संघातील हुकमी स्ट्रायकर टॉम बूनने 7 गोल केले आहेत. बेल्जियमने या स्पर्धेत पाच सामन्यातून प्रतिस्पर्धी संघाकडून 5 गोल करवून घेतले आहेत. विश्वचषक हॉकीच्या मानांकनात बेल्जियमचा संघ सध्या दुसऱया क्रमांकावर आहे.
जर्मनी संघाने 2002 आणि 2006 साली विश्वचषक हॉकी स्पर्धा आतापर्यंत जिंकली आहे. भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या 2023 च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध जर्मनीचा संघ 2 गोलांनी पिछाडीवर होता. पण शेवटच्या 3 मिनिटांच्या कालावधीत त्यांनी 2 गोल नोंदवून हा सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत नेला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीने इंग्लंडचा पराभव करत उपांत्यफेरी गाठली.
चौथ्या मानांकित जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शुक्रवारी उपांत्यफेरीचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने जर्मनीवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर जर्मनीच्या खेळाडूंनी सामन्याच्या उत्तरार्धात आपल्या डावपेचात बदल करत ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीवर तसेच गोलरक्षकावर दडपण आणण्यात यश मिळविले आणि त्यांनी या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणत अंतिमफेरी गाठली. 2006 नंतर जर्मनीचा संघ पुन्हा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. जर्मनी संघातील पेनल्टी कॉर्नर तज्ञ गोन्झालो पिलेट याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शानदार हॅट्ट्रिक नोंदविली होती. या हॅट्ट्रिकमुळे जर्मनीने ऑस्ट्रेलियाचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले. 2016 साली ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणाऱया अर्जेंटिना संघाचे प्रतिनिधित्व गोन्झालो पिलेटने केले होते. पण त्यानंतर तो जर्मनी संघाचे प्रतिनिधित्व करू लागला. बेल्जियम संघातील बचावफळीत खेळणारे आर्थर व्हॅन डोरेन आणि आर्थर डी. स्लोव्हेर हे प्रमुख खेळाडू म्हणून ओळखले जातात. कर्णधार डिनेर आणि व्हेगनेज हे मध्यफळीवर नियंत्रण ठेवत असतात.
भारतामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत जर्मनी आणि बेल्जियम हे दोन्ही संघ एकाच गटात म्हणजे ब गटात खेळत होते. प्राथमिक गटातील उभय संघातील झालेला सामना 2-2 असा बरोबरीत राहिला होता. जर्मनी संघातील टॉम तसेच वेलेन हे प्रमुख खेळाडू आहेत. जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात आतापर्यंत 35 सामने झाले असून त्यामध्ये बेल्जियमने 15 सामने जिंकले आहेत तर जर्मनीने 13 सामन्यात विजय मिळविला आहे. 7 सामने बरोबरीत राहिले आहेत. गेल्या वषीच्या नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील सामन्यात जर्मनीने बेल्जियमचा पराभव केला होता.