भुदरगड तालुक्यात आनंदोत्सव : आता हनी पार्क उभारणीकडे पाऊल
पाटगांव प्रतिनिधी
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने घेतलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत कोल्हापूर जिह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘पाटगाव’ला कांस्य पदक मिळाले आहे. मधाचे गाव म्हणून ओळख असलेले पाटगांव देशाच्या नकाशावर गेल्याने तालुक्यात आनंदोत्सव साजरा झाला.
भुदरगड तालुक्यातील पाटगाव परिसरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतीला जोडधंदा म्हणून मध व्यवसाय, मधुमक्षिकापालन केले जात आहे. परिसरात सुमारे दोनशेवर मधपाळ असून ते मधसंकलनाचा व्यवसाय करतात. परिसरात सुमारे 2 हजार पेट्यांद्वारे मधसंकलन केले जाते. दरवर्षी 8 ते 10 टनांपर्यंत मधनिर्मिती गावात करण्यात येते. त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाटगावची ओळख मधाचे गाव म्हणून झाली आहे.
पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येऊन येथे शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीने पाटगावमध्ये ‘मधाचे गाव पाटगाव‘ उपक्रम राबवला आहे. याद्वारे ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘नाबार्ड’च्या सहकार्यातून ‘पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी’ स्थापन केली आहे. या माध्यमातून मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, मध निर्मिता, विक्री उद्योगाला चालना मिळाली आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रकाश आबिटकर, खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नॅशनल फेलो अधिकारी संदेश जोशी, तहसिलदार आश्विनी वरुटेंचे योगदान लाभले आहे.
पाटगावमध्ये लवकरच हनी पार्क साकारणार
पाटगावच्या मधाचे ब्रँडींग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटींगचे काम गावातूनच होणार आहे. गावामध्ये मधमाशीपालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र ग्रामपंचायतीमध्ये तयार केले आहे. येथे भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहण्यासाठी लवकरच हनी पार्क (मध उद्यान) ही तयार करण्यात येणार आहे.
सरपंच विलास देसाई (ग्रामपंचायत, पाटगांव )
सामूहिक सुविधा केंद्रात होणार मधसंकलन
पाटगावमध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात परिसरातील मधाचे संकलन, प्रक्रिया व विक्री होणार आहे. त्यामुळे पर्यटक, नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदीची संधी मिळणार आहे.
राजाराम पाटील, ग्रामसेवक, पाटगाव