भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या असून ही घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात आज सायंकाळी 6 च्या दरम्यान घडली. पांढऱ्या मारुती स्विफ्ट डिझायरमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर चार राऊंड फायर केले. त्यात त्यांच्या पाठीला गंभिर दुखापत झाली आहे.
सहारनपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) डॉ. विपिन टाडा हिंदुस्थानशी बोलताना म्हणाले कि, “चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही सशस्त्र लोकांनी गोळीबार केला आहे. एक गोळी त्याच्या समोरून गेली. सध्या त्यांची परिस्थिती बरी असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) नेण्यात आले आहे. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.” सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद शहरात त्यांच्यावर हल्ला झाला आहे.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण टोयोटा फॉर्च्युनरमधून प्रवास करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. गाडीच्या सीटवर आणि दरवाजावर गोळ्यांच्या खुणा पोलिसांना आढळून आल्या आहेत. हे बंदुकधारी लोक ताफ्याच्या मागून कारजवळ आले आणि त्यांनी चार राऊंड फायर केले. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर गोळी लागली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्लेखोर पांढऱ्या मारुती स्विफ्ट डिझायरमधून हरियाणाची लायसन्स प्लेट लाऊन आले होते.