बेळगाव : कर्नाटक लॉ सोसायटीच्या राजा लखमगौडा लॉ कॉलेजतर्फे घेण्यात आलेल्या 13 व्या एम. के. नांबियार मुटकोर्ट स्पर्धेमध्ये भोपाळ येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल कट्टी व कर्नाटक स्टेट लॉ युनिव्हर्सिटीचे प्रा. सी. एस. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या मुटकोर्ट स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. समारोप कार्यक्रमावेळी न्यायाधीश अनिल कट्टी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीमागे तपासाचा दृष्टिकोन ठेवावा, असा सल्ला दिला. तसेच या व्यवसायामध्ये उत्तम काम करण्यासाठी वक्तृत्व कौशल्य सुधारावेत, असे सांगितले.
प्रा. सी. एस. पाटील म्हणाले, कायद्यामुळे आपण अनेकांना न्याय मिळवून देत असतो. त्यामुळे हा व्यवसाय एक प्रकारची सेवा आहे. कायद्याच्या ज्ञानामुळे आपण सरकार विरोधातही उभे राहू शकतो, असे त्यांनी सांगितले. व्यासपीठावर गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन एम. आर. कुलकर्णी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. ए. एच. हवालकर यांनी सर्व विजेत्यांचे कौतुक केले. प्रा. शिल्पा रायकर यांनी स्वागत तर प्रा. अश्विनी परब यांनी परिचय करून दिला. सौम्या शेट्टी यांनी आभार मानले. यावेळी केशमा भट्ट, तेजस्विनी सोमसाळे यासह इतर उपस्थित होते. भोपाळ येथील प्रथम क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना 30 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पुणे येथील अॅड. बाळासाहेब आपटे कॉलनीने द्वितीय क्रमांक पटकाविला. मंगळूर येथील श्रीखंडा एम. यांनी बेस्ट मुटर (पुरुष) व श्रास्ता तंजावर (महिला) यांनी पटकाविला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.