मध्यावधी निवडणुकीत ट्रम्पना धक्का ः सिनेटवर डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने पुन्हा एकदा 2 वर्षांसाठी सिनेटवर आपले नियंत्रण मिळवले आहे. याचवेळी पुन्हा सत्तेत येण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या आशा मावळताना दिसत आहेत. नेवाडामध्ये सिनेटर कॅथरीन कॉर्टेझ मास्टो यांच्या विजयाने डेमोक्रॅटिक पक्षाला 100 सदस्यीय सिनेटमध्ये 50 जागा मिळाल्या असून त्यांचे बहुमत अबाधित आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांसाठी सिनेटवर नियंत्रण मिळवण्यासाठी नेवाडामधील हा विजय महत्त्वपूर्ण होता. कॅथरीन कॉर्टेझ मास्टो यांनी अत्यंत निकराच्या लढतीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ऍडम लॅक्सॉल्ट यांचा पराभव केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॅक्सॉल्ट यांचे समर्थन केले होते.
अमेरिकन सिनेटमध्ये सध्या डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन यांचे प्रमाण 50-50 अशा पद्धतीने विभाजित आहे. नेवाडाच्या निकालानंतर आता जॉर्जिया हे एकमेव राज्य उरले आहे, जिथे दोन्ही पक्षांमध्ये लढत अजूनही सुरू आहे. रिपब्लिकन उमेदवार हर्शेल वॉकरविरुद्ध 6 डिसेंबर रोजी जॉर्जियामध्ये डेमोक्रॅटिक सिनेटर राफेल व्हर्नाक विजयी झाल्यास, डेमोक्रॅटचे बहुमत 51-49 पर्यंत वाढेल.
अमेरिकन काँग्रेसच्या (संसद) सिनेट आणि प्रतिनिधीगृह या दोन सभागृहांसाठी 8 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. नवनिर्वाचित सिनेटचा शपथविधी 3 जानेवारीला होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी मध्यावधी निवडणुकांना ‘लोकशाहीसाठी चांगले दिवस’ असे म्हटले आहे. अलीकडच्या काळात आपल्या लोकशाहीची कसोटी लागली आहे, मात्र अमेरिकन जनतेच्या मतांनी आपण लोकशाही म्हणजे आपणच आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.