54 अब्ज रुपयांची सुपरयॉट जप्त
इटलीच्या अर्थमंत्र्यांनी रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी कथितपणे संबंधित एका सुपरयॉटला बंदर न सोडण्याचा आदेश दिला आहे. अर्थमंत्री डेनियल प्रेंको यांनी काही पुराव्यांच्या आधारावर ही सुपरयॉट रोखण्याचा आदेश दिला आहे. या सुपरयॉटचा मालक रशियन सरकारशी संबंधित असल्याचे या पुराव्यांद्वारे निदर्शनास आले होते. युरोपीय महासंघाच्या निर्बंधांच्या आधारावर ही सुपरयॉट रोखण्यात आली आहे.
सुपरयॉटच्या मालकाची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. युरोपीय महासंघाने संबंधित व्यक्तीला प्रतिबंधित यादीत समाविष्ट करण्यास सांगितल्याची माहिती इटलीच्या अर्थमंत्र्यांकडून देण्यात आली. पुढील कारवाईपर्यंत ही सुपरयॉट जप्त असणार आहे. या सुपरयॉटची किंमत सुमारे 54 अब्ज रुपये आहे. रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचा या सुपरयॉटशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते. या सुपरयॉटचे नाव शहरजाद असे आहे. रशियातील ऊर्जा कंपनी रोसनेफ्टचे माजी प्रमुख एडुआर्ड खुदैनाटोव्ह यांची ही सुपरयाट असल्याचे सांगण्यात आले. लक्झरी सुपरयॉटची देखभाल ठेवणारी कंपनी इटालियन सी ग्रूपच्या प्रवक्त्याने सुपरयॉट जूनपर्यंत रवाना होणार होती असे सांगितले. शहरजादपूर्वी रशियातील राजकीय नेते सुलेमान केरीमोव्ह यांची याट ‘अमेडिया’ जप्त करण्यात आली होती.