6 लाख कोटी बुडाले, सेन्सेक्समध्ये 1400 अंकांची घसरण
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठण्यासोबत रुपयाच्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजाराला सोमवारी मारक ठरला. 1400 अंकांच्या जबर घसरणीसह शेअर बाजाराने सोमवारी ब्लॅक मंडे अनुभवला. गुंतवणूकदारांचे सुमारे 6 लाख कोटी रुपये या दरम्यान बुडाले आहेत.
सोमवारी सकाळपासूनच शेअर बाजाराचा मूड खराब होता. सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 1457 अंकांनी कोसळत 52,846.70 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 427 अंकांच्या घसरणीसह 15,774.40 अंकांवर बंद झाला. कमकुवत जागतिक संकेताचा परिणाम बाजारावर दिसला. सोमवारी बाजारात चौफेर विक्री दिसून आली. अमेरिकेत महागाईसंबंधीची आकडेवारी जाहीर झाली असून 1981 नंतर कंझ्युमर प्राइस इंडेक्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा मोठा असर भारतीय शेअर बाजारावर दिसला आहे. निफ्टीत बँक आणि वित्त निर्देशांक 3 टक्के इतका नुकसानीत होता. तर आयटी निर्देशांक तर 4 टक्के आणि ऑटो 2 टक्के तसेच रियल्टी निर्देशांक 3 टक्के इतका खाली घसरला होता. एफएमसीजी, धातू आणि फार्मासह सर्व प्रमुख निर्देशांक कमकुवत असल्याचे दिसून आले. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. बजाज, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एनटीपीसी यांचे समभाग मोठय़ा प्रमाणात घसरलेले दिसले. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मात्र 6 लाख कोटी रुपयांनी घटल्याचे दिसले. जून महिन्यात गुंतवणूकदारांना जवळपास शेअर बाजारातील या घसरणीत सुमारे 11 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या महिन्यात 9 ट्रेडिंग दिवसात सेन्सेक्स निर्देशांक 2800 अंकांनी घसरल्याचे समोर आले आहे. विदेशातील बाजारात अमेरिकेतील नॅसडॅक 400 अंकांनी कोसळला तर युरोपियन बाजारही 100 ते 280 अंकांची घसरण नोंदवत होते.
आशियाई बाजारात निक्की 836अंकांनी, हँगसेंग 738 अंकांनी व कोस्पी 91 अंकांनी घसरलेला दिसला.