कागल, इम्रान मकानदार
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत रविवारी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जवळपास 35 ते 40 आमदार असल्याची माहिती समोर आलीय. अशा राजकीय परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते व कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी आमदार मुश्रीफ यांनी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर कागल तालुक्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांची भूमिका काय राहणार? याबाबत जिल्ह्यासह तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
2019 ची विधानसभा निवडणूक लढवून आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात कडवी झुंज देणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. निवडणूक निकाल होताच मतदार संघात त्यांनी आमदार मुश्रीफ यांना टक्कर देण्यास सुरुवात केली होती.विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हे मतदार संघात भाजपाची ताकद वाढवत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक आहे.आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल विधानसभा मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत.मात्र आमदार हसन मुश्रीफ हे शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने समरजीतसिंह घाटगे यांची पुढील भूमिका काय असणार याकडेही सर्वांच्या नजरा लागून आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची जवळीक गेल्या काही दिवसांपासून आमदार मुश्रीफ यांच्याशी वाढली आहे.संजयबाबा घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तब्बल सहावेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती.यामध्ये फक्त १३ महिन्यांचा अपवाद वगळता आमदार मुश्रीफ त्यांनी आपली आमदारकी कायम ठेवली आहे.महाविकास आघाडी म्हणून आमदार हसन मुश्रीफ व संजयबाबा घाटगे यांची जवळीकता पाहता घाटगे या राजकीय उलथापालथीनंतर नंतर काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत .
खासदार संजय मंडलिक हे शिंदे फडणवीस सरकारमध्येच असल्याने आमदार हसन मुश्रीफ यांच्याबद्दल काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.आमदार हसन मुश्रीफ यांची आता सहाव्यांदा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.शरद पवार यांचे ते अत्यंत जवळचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी या राजकीय उलथापालथेत अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीच्या काही कार्यक्रमांमध्ये आमदार मुश्रीफ यांनी विकास निधी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानले होते.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही आमदार मुश्रीफ यांच्या आरोग्य सेवेचे कौतुक होताना दिसत होते.आमदार हसन मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत पाहता अजित पवार यांनी त्यांना पहिल्याच यादीत कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देऊन त्यांच्या कामाची पोहोचपावती दिल्याचे बोलले जात आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे गेल्या काही दिवसांपासून आमदार मुश्रीफ यांना तीव्र विरोध करताना दिसत होते.पण आता आमदार मुश्रीफच शिंदे -फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे समरजितसिंह घाटगे यांची भूमिका आता काय राहणार ?याबाबत उत्सुकता आहे.