ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. तथापि, या दोन पक्षांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी असून, ते पक्ष स्वतःहून राजकीयदृष्टय़ा संपतील. आगामी काळात भाजपामध्ये अनेक आश्चर्यकारक पक्षप्रवेश झालेले दिसतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
बावनकुळे म्हणाले, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) हे पक्ष सोबत आले होते. पण तीन पक्ष एकत्र आले तरी त्यांच्या रिक्षाची तीन चाके वेगवेगळय़ा दिशेला होते. सत्तेच्या अडीच वर्षात मुख्यमंत्री कोणाला भेटत नव्हते तर पालकमंत्री केवळ मतदारसंघापुरते होते. त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. परिणामी या पक्षांमध्ये काहीही होऊ शकते.
अधिक वाचा : ठाकरे गटाचे 4 आमदार आमच्या संपर्कात, राणेंचा दावा
राष्ट्रवादी अथवा काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. नेतृत्त्वावरील नाराजीमुळे हे पक्ष स्वतःहून राजकीयदृष्टय़ा बुडतील. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामध्ये कोणतेही राजकारण नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार किरण पाटील असतील व त्यांना शिक्षक परिषद समर्थन देईल, अशी घोषणा यावेळी बावनकुळे यांनी केली.