उत्तर प्रदेशातील गॅंगस्टर आणि राजकारणात सक्रिय असलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर बंदूक चालवल्याचा आरोप करून भारतीय जनता पक्ष (भाजप) राज्य चालवण्यासाठी “बंदुकीचे धाक” दाखवत असल्याचे म्हटले आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले कि, “कट्टरतावाद थांबविला गेला पाहिजे आणि जे लोक हत्येचा आनंद साजरा करत आहेत त्यांनाही मी सांगतो कि “मीही मरायला तयार आहे… पण कट्टरतावाद थांबला पाहीजे. मी नक्कीच उत्तर प्रदेशला भेट देईन, मला कोणाचीही भीती वाटत नाही…जब प्यार किया तो डरना क्या.” असे म्हणून त्यांनी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशात त्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ छेडला.
अतिक अहमद याच्या हत्येला “थंड डोक्याने केलेली हत्या” असे म्हणून ओवेसी यांनी यूपीमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे. “मी नेहमीच म्हणतोय कि उत्तर प्रदेशात भाजप कायद्याच्या जोरावर नाही तर बंदुकीच्या जोरावर सरकार चालवत आहे. या घटनेनंतर जनतेचा देशाच्या संविधानावर आणि कायदा- सुव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही” अशीही काळजी त्यांनी व्यक्त केली.