डॉ. शेखर साळकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात स्तनकर्करोग हा सामान्य आजार आहे. दरवर्षी गोव्यात 250 ते 300 नवे स्तनकर्करोगाचे रूग्ण आढळतात. आतापर्यंत जे स्तनकर्करोग तपासणी शिबिरे जी झाली ती शहरी भागात आयोजित करण्यात आली. परंतु आता भाजपच्या मेडिकल सेलतर्फे ग्रामीण भागातील तळागाळात या आजाराबाबत जागृती व्हावी यासाठी आज मंगळवार दि. 24 रोजीपासून राज्यात स्तनकर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पंचायतीत एका शिबिराचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती भाजप मेडिकल सेलचे डॉ. शेखर साळकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पहिल्या टप्प्यात 10 मतदारसंघात सदर शिबिर आयोजित करण्यात येत असून आज मंगळवार दि. 24 रोजी कुडणे सरकारी प्राथमिक शाळा येथे सकाळी 9.30 वा. मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. येत्या काही दिवसानंतर सांगे, पेडणे, काणकोण, मये, केपे, मांद्रे, शिवोली, कुडचडे, बुधवार दि. 25 रोजी सावर्डे, गुरूवार दि, 26 रोजी आमोणा, शुक्रवार दि. 27 रोजी काले, शनिवार दि. 28 रोजी वेळगे, सोमवार दि. रोजी 30 सुर्ल, बुधवार दि. 1 जून रोजी मोले, 2 जून रोजी पाळी, 3 जून रोजी साकोर्डा, 4जून रोजी नावेली, दि. 5 रोजी धारबांदोडा, दि. 7 रोजी दाभाळ येथे शिबिरे होतील. एकूण तेरा दिवस स्तनकर्करोग तपासाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे स्तनतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 30 ते 70 वयोगटातील महिलांची तपासणी यात करण्यात येणार आहे लवकर निदान झाले तर त्यावर योग्य उपचार घेता येईल असे शेखर साळकर यांनी सांगितले.
साधारणतः शंभर महिलांनी या शिबिरात सहभागी व्हावे. सकाळी 9 वा ते सायं. 4 वाजेपर्यंत सदर शिबिर चालेल. ग्रामीण भागात याविषयी जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम असून किमान शंभर महिलांनी पंचायतमध्ये येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. साळकर यांनी केले. 30 ते 60 या वयोगटात सामान्यतः स्तनकर्करोगाची लक्षणे आढळून येतात. या शिबिरातून जर कुणी स्तनकर्करोगाची लक्षणे असलेली प्रकरणे आढळली तर त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना उपचारपद्धतीबाबतही सल्ला देण्यात येईल. महिला या कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी असे न करता या शिबिराचा लाभ घ्यावा. स्तनकर्करोगाच्या उपचारासाठी सर्व सुविधा गोव्यात उपलब्ध आहेत. तपासणीदरम्यान जर काही लक्षणे दिसून आले तर त्यावर काही चाचणी करण्यात येतील अशी माहिती डॉ. शेखर साळकर यांनी यावेळी दिली.