12 हून अधिक जण बेपत्ता ः तीनमजली इमारतीचे नुकसान वृत्तसंस्था
जर्सी आयलँड
इंग्लंडच्या जर्सी आयलँडवर एका तीन मजली इमारतीत झालेल्या स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. अग्निशमन दल, बचावपथक, श्वानपथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव तसेच शोधमोहीम हाती घेतली आहे.
जर्सी प्रशासनाने बचावकार्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात स्फोटानंतर झालेले नुकसान अन् इमारतीचा ढिग दिसून येत आहे. स्फोटामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. स्फोटामुळे तीनमजली इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. हा मोठय़ा तीव्रतेचा स्फोट होता असे पोलिसांनी सांगितले आहे. लोकांना मदत करण्यासाठी अधिकाऱयांना तैनात करण्यात आले आहे. या घटनेमुळे मोठे दुःख झाले असून कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत असे उद्गार ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक रॉब यांनी काढले आहेत.
स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकांना ढिगाऱयाखालून बाहेर काढत सुरक्षितस्थळी पोहोचविण्यावर बचाव पथकाने लक्ष केंद्रीत केले आहे. स्फोटाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय असे जर्सी पोलीस विभागाचे मुख्य अधिकारी रॉबिन स्मिथ यांनी म्हटले आहे.
स्फोटानंतर लागलेली आग विझविण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. घटनास्थळावरील ढिगारा अत्यंत सावधपणे हटविला जात आहे. यामुळे बचावकार्याला वेग आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.