रेडरहट्टीनजीक घटना : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
वार्ताहर /अथणी
अथणी-सत्ती रस्त्यावरील रेड्डरहट्टीजवळ करीमसुती कालव्यामध्ये कार कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा बुडून मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. महादेव परसप्पा चिगरी (वय 26), सुरेश तुकाराम बडची (वय 25) दोघे राहणार रेड्डरहट्टी अशी मृतांची नावे आहेत. तर श्रीकांत नडवीनमनी (वय 23) असे जखमीचे नाव आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, महादेव चिगरी, सुरेश बडची व श्रीकांत नडवीनमनी हे कार क्रमांक एमएच 05 एबी 6674 मधून शुक्रवारी दुपारी आपले काम आटोपून घरी जात होते.
दरम्यान, करीमसुत्ती कालव्यानजीक कार येताच चालक श्रीकांत नडवीनमनी याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट कालव्यात कोसळली. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दल, पोलिसांना सदर घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानुसार क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन कालव्यातून बाहेर काढण्यात आले.
अपघातादरम्यान चालक श्रीकांत याने वाहनातून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला. पण सुदैवाने बचावला आहे. तर महादेव व सुरेश वाहनातच अडकून पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तास कसोशीचे प्रयत्न करुन मृतदेह बाहेर काढले. ते पाहून नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. डीवायएसपी एस. व्ही. गिरीश, सीपीआय शंकरगौडा बसगोडर, पीएसआय कुमार हडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अथणी शासकीय दवाखान्यात विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.