केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणाऱ्याचे पोलिसांनाच आव्हान
प्रतिनिधी /नागपूर
भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारीची नागपूर पोलिसांनीही कसून चौकशी सुरू केली आहे. गडकरी यांना धमकी देणारा हा कैदी आहे. धमकी दिल्याचे प्रकरण घडून 72 तास
उलटले तरी त्याच्याकडील मोबाईल सापडलेला नाही. मोबाईल कुठे ठेवला हे सांगणे तर सोडाच पण उलट हा कैदी पोलिसांनाच आधी तो मोबाईल घेऊन या, (पहले फोन लेके आओ) मगच आरोप करा, असे आव्हान देत आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
हिंडलगा कारागफहात जेरबंद असलेला कुख्यात गुंड जयेश पुजारी याने नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. त्याने तुऊंगातून फोन करून गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण त्याने ज्या मोबाईलवरून फोन केला तो फोन सापडत नसल्याने तिढा वाढला आहे. पोलिसांनी त्याला अनेक अंगाने प्रश्न केले. पण तो काही पोलिसांना ताकास तूर लागू देत नसल्यामुळे करावे तरी काय? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
उलट जाओ पहले फोन लेके आओ, अशी डायलॉगबाजी हा कैदी करत आहे. तुम्ही जो मोबाईल माझा आहे असे सांगताय आधी तो मोबाईल शोधा. त्यातील सीम कार्डही शोधा, असे आव्हानच हा कैदी पोलिसांना देत आहे. त्यामुळे 72 तासानंतरही फोन सापडत नसल्याने पोलिसांना मोठे अपयश आले आहे. जयेश याने तुऊंगातूनच नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन केला होता. 100 कोटींची खंडणी त्याने यावेळी मागितली. तसेच आपण दाऊद इब्राहिमचा साथीदार असल्याचे त्याने म्हटले होते.
डायरीतील नोंदींच्या अनुषंगाने तपास
हिंडलगा कारागृहातील तपासादरम्यान पोलिसांना धमकी देणाऱ्या संशयित कैद्याकडे एक डायरी मिळाली होती. या डायरीमध्ये राजकीय नेते आणि मंत्र्यांचे फोन नंबर नोंद आहेत. पोलिसांनी ही डायरी जप्त केली आहे. तसेच जयेशकडे राजकीय पुढारी आणि मंत्र्याचे नंबर कसे आले? याचा शोध घेतला जात आहे. या मंत्री, पुढाऱ्यांशी जयेशचे संबंध होते का? की हे मंत्री आणि पुढारी त्याच्या रडारवर होते? याचाही पोलीस शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जयेशवर बेळगावातही एफआयआर
फोनचा शोध अद्यापही सुरूच : साथीदारांची जबानी
नितीन गडकरी यांना धमकावणाऱ्या कैद्याविरुद्ध बेळगावातही एफआयआर दाखल झाला आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून जयेश पुजारी विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि. 506, 507 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून आता बेळगाव पोलीसही या प्रकरणाचा तपास करणार आहेत. दरम्यान जयेशला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलिसांचे प्रयत्न सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. जयेश उर्फ जयेशकांत याने 14 जानेवारी रोजी नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात कॉल करून 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
यासाठी आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतील असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हे प्रकरण दोन्ही राज्यांच्या तपास यंत्रणांनी गांभीर्याने घेतले आहे.
केंद्रीय मंत्र्यांना धमकावण्यासाठी वापरलेले सीमकार्ड ज्या तरुणाच्या नावे आहे त्या तरुणाची चौकशी केली आहे. कोल्हापूर एटीएस व नागपूर पोलिसांनी कारागृहात तपासणी करूनही जयेशकडे फोन सापडला नाही. त्यामुळे त्याने संपर्क केलेल्या क्रमांकावरून त्याचे मूळ शोधण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत आहे. आयपीएस अधिकारी अलोककुमारना 21 एप्रिल 2018 रोजी धमकावल्या प्रकरणी येथील एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 14 सप्टेंबर 2021 पासून जयेश हा कारागृहात आहे. यापूर्वी कारागृह अधिकाऱ्यांनी जयेशच्या खोलीत तपासणी केली असता मोबाईल व सीमाकार्ड सापडले होते.
आता नितीन गडकरी यांना धमकावण्यासाठी वापरलेल्या मोबाईलचा शोध घेत आहेत. जयेशने मोबाईलचा वापर करून धमकावला असणार, अशा आशयाची फिर्याद दाखल केली असून बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.