लाजिरवाण्या कृत्यानंतर पक्षातून निलंबित : चूक मान्य करत दिला राजीनामा
वृत्तसंस्था / लंडन
जगात स्वतःला सर्वात सभ्य ठरविणाऱया ब्रिटनमध्ये एका खासदाराला असभ्य वर्तनासाठी राजीनामा द्यावा लागला आहे. सत्तारुढ कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे खासदार नील पारिस यांच्यावर हाउस ऑफ कॉमन्समध्ये कामकाजादरम्यान मोबाइलवर पोर्न व्हिडिओ पाहिल्याचा आरोप आहे. पारिस यांनी शनिवारी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर स्वतःच्या कृत्याला ‘इन ए मूव्हमेंट ऑफ मॅडनेस’ ठरवत आणि रडत सर्वांची माफी मागितली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीने नील पारिस यांना शुक्रवारीच निलंबित केले होते. पारिस यांनी स्वतःच्या या कृत्यासाठी पार्लमेंट स्टँडर्डस कमिशनरसमोर स्वतःची बाजू मांडली होती.
मागील आठवडय़ाच्या प्रारंभी एका प्रसारमाध्यमाने महिला मंत्र्याने पुरविलेल्या माहितीचा दाखला देत संसदेत पोर्नोग्राफिक सामग्री पाहिली गेल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. कॉमन्स चेंबरमध्ये माझ्यासोबत बसलेल्या एका पुरुष खासदाराला पोर्न फिल्म पाहताना पाहिल्याचे म्हटले होते. हाच खासदार नंतर एका समितीच्या सुनावणीदरम्यान देखील पोर्नोग्राफी पाहत होता, असे महिला मंत्र्यानी सांगितले.
आरोपी खासदार नील पारिस हे पेशाने शेतकरी आहेत. माझ्यामुळे माझे कुटुंब आणि माझ्या संसदीय सहकाऱयांना गोंधळाला तोंड द्यावे लागल्याचे पारिस यांनी राजीनामा दिल्यावर म्हटले आहे.
जेव्हा जेव्हा मी आक्षेपार्ह सामग्री पाहिली होती, तेव्हा तो केवळ ऍक्सिडेंटल मूव्हमेंट होता. मी ट्रक्टर्सची एक वेबसाइट शोधत होतो आणि त्याच्याशी मिळत्याजुळत्या दुसऱया वेबसाइटवर क्लिक करून बसलो, त्यावर पोर्न सामग्री होती. काही वेळ ती पाहण्याची चूक माझ्याकडून घडल्याचे पारिस म्हणाले.
दुसऱयावेळी जाणूनबुजून पोर्न सामग्री पाहणे माझा सर्वात मोठा अपराध होता. त्यावेळी मी सभागृहात मतदान करण्यासाठी स्वतःचा क्रमांक येण्याची प्रतीक्षा करत होतो. तो एक मूर्खतापूर्ण क्षण होता. मी जे काही केले, ते अभिमानास्पद निश्चितच नाही. माझ्या आसपास बसलेल्या लोकांनीही ती पोर्न सामग्री पहावी असा माझा हेतू नव्हता असे पारिस यांनी म्हटले आहे.
पारिस यांनी राजीनामा देण्यापूर्वी त्यांच्या पत्नीची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. माझ्या पतीने यापूर्वी असे काही केल्याचे मला माहित नाही. माझे पती एक प्रेमळ व्यक्ती असल्याचा दावा पारिस यांच्या पत्नीने केला आहे.