संभाजीनगर येथील घटना : खुनाचे कारण अस्पष्ट
निपाणी : संभाजीनगर येथे शाळकरी मुलाचा निर्घृण खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली. साकिब समीर पठाण (वय 14, रा. संभाजीनगर, वडर गल्ली) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पंधरा दिवसात दुसऱ्या झालेल्या खून प्रकरणाने शहर चांगलेच हादरले आहे. विशेष म्हणजे मृत व मारेकरी हे अवघ्या 14 ते 23 वर्ष गटातील असल्याने चिंता व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संभाजीनगर येथे बाळूमामा उद्यानानजीक एका बंद बंगल्याच्या दारात शुक्रवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याचे फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तासभर मृतदेह कोणाचा आहे? हे समजले नव्हते. सदर बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर मृतदेह साकिब याचा असून तो संभाजीनगर येथील असल्याचे स्पष्ट झाले. साकिब गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास घराबाहेर पडला, पण रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्याचवेळी सकाळी 8 च्या सुमारास साकिबचा मृतदेह आढळला. सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक उमादेवी, बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश पवार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यापाठोपाठ जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.