17 जवान जखमी : चौघांची प्रकृती गंभीर
वृत्तसंस्था/ रायपूर
निवडणूक सेवेवर असलेल्या बीएसएफ जवानांच्या बसला शुक्रवारी छत्तीसगडमध्ये अपघात झाला. अपघातोवेळी सदर बसमध्ये एकूण 32 जवान होते. या अपघातात 17 जवान जखमी झाले असून चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. 13 जवानांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल धर्मजयगड येथे उपचार सुरू आहेत. चार जवानांना अधिक उपचारासाठी मेडिकल कॉलेज रायगडमध्ये पाठवण्यात आले आहे.
छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 जागांवर मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. याचदरम्यान धरमजयगडच्या छुही पहाड येथील मतदान केंद्राची पाहणी करून परतणाऱ्या बीएसएफ जवानांची बस चाल्हा गावाजवळील कामोसिन दांडजवळ नियंत्रणाबाहेर जाऊन झाडावर आदळली, अशी माहिती पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी दिली.