वृत्तसंस्था / जयपूर
भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानने भारताच्या वायुक्षेत्रात घुसविलेले एक ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाडविले आहे. त्यातील अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 10 कोटी रुपये आहे. शनिवारी ही माहिती देण्यात आली.
सीमा सुरक्षा दलाचे सैनिक शुक्रवारी रात्री सीमेवर गस्त घालत असताना त्यांना हे ड्रोन भारताची वायुसीमा ओलांडत असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर ड्रोन पाडविण्याची व्यवस्था करण्यात आली. केवळ पाच मिनिटांमध्ये ड्रोनवर गोळीबार करुन ते पाडविण्यात आले. त्यात हेरॉईन या अंमली पदार्थाची दोन पाकिटे होती. ती हस्तगत करण्यात आली असून त्यांची चाचणी करण्यात आली. गेल्या महिनाभरात पाकिस्तानची सहा ड्रोन्स पाडण्यात आली आहेत. ही पाकिटे घेण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार पुढची कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.