राजापूर / वार्ताहर
राजापूर तालुक्यातील निवेली येथील प्रकाश घाणेकर यांच्या बैलाने गुरुवारी रात्री मानेश्वर मंदिर परिसरात कातळ सड्यावर गावठी बॉम्ब खाल्ल्याने जबडा फुटल्याची घटना घडली आहे. या संदर्भात घाणेकर यांनी सागरी पोलीस ठाणे नाटे यांना खबर दिली. पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली असून बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. जखमी बैलावर उपचार सुरु असून बैलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
तपासात कोणत्याही प्रकारचे बॉम्ब सापडले नाही मात्र बैलाच्या जबड्यामध्ये सुतळ सदृश्य वस्तू सापडल्याचे आणि गावठी बॉम्बनेच जबडा फुटल्याचे सांगितले जात आहे. शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवले जात असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पोलिसांची टीम संशयित ठिकाणी शोधकार्य करत असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.