3 लाख 5 हजार वाहनांची विक्री ः उत्सवी हंगामात वाहनांना वाढती मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्सवी हंगाम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऑटो क्षेत्राने ऑगस्टमध्ये चांगल्या विक्रीची नोंद करत भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे काम केले आहे. सेमीकंडक्टरचा पुरवठा सुरळीत झाल्याने वाहन विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. याने कंपन्यांनीही आपली वाहन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी धडपड चालवलेली दिसते आहे.
भारतातील 7 आघाडीवरच्या पॅसेंजर वाहनांनी ऑगस्टमध्ये 3 लाख 5 हजार 744 वाहनांची विक्री करत 30 टक्के वाढ मागच्या तुलनेत नोंदवली आहे. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये 2 लाख 34 हजार वाहनांची विक्री झाली होती. गणेश चतुर्थीसह उत्सवी हंगामाला सुरूवात झाल्याने ग्राहकांनी वाहन खरेदीसाठी उत्साह दाखवल्याचे दिसून आले. मारुती सुझुकीने ऑगस्टमध्ये 1 लाख 34 हजार 166 वाहनांची विक्री केली असून मागच्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत वाढ 30 टक्के नोंदली आहे. यात बलेनो, सेलेरियो, डिझाइर व इग्निस यांची विक्री 57 टक्के वाढत 71 हजार 557 वाहनांवर राहिली आहे. हय़ुंडाईने 5 टक्के वाढीसह ऑगस्टमध्ये 49 हजार 510 वाहनांची विक्री केली आहे. हय़ुंडाईच्या नव्या टुस्कॉनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभल्याचे कंपनीने म्हटले आहे. पॅसेंजर वाहन विक्री कंपनी टाटा मोटर्सने 68 टक्के वाढीसह 47 हजार 166 वाहनांची विक्री मागच्या महिन्यात केली आहे. किया मोटर्सने 32 टक्के वाढीसह 22 हजार 322 वाहनांची विक्री केलीय.
सध्याला मागणी अधिक असली तरी सेमीकंडक्टरचा पुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. काही मॉडेलकरीता मात्र अद्यापही सेमीकंडक्टरसाठी थांबावे लागते आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे. महिंद्रा आणि महिंद्रा यांनी ऑगस्टमध्ये 87 टक्के वाढीसह 29 हजार 852 वाहनांची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरची 17 टक्के वाढीसह 14 हजार 959 वाहने विक्री झाली आहेत. व्यावसायिक वाहनांची विक्री 4 टक्के वाढीसह 5 हजार 3 इतकी राहिली होती.
इलेक्ट्रिक स्कूटर विक्री वाढली
ई-स्कूटर नोंदणीचा विचार करता ऑगस्टमध्ये ही नोंदणी जुलैच्या तुलनेत 10 टक्के वाढली आहे. ऑगस्टमध्ये 36 हजार 463 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. जुलैमध्ये ती 33 हजार 99 इतकी होती. 8 कंपन्यांचा समावेश असलेल्या वाहन (व्हीएएचएएन) यांच्या अहवालातून विक्रीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या ई-स्कूटर गटात बेंगळूरु स्थित ऍथर एनर्जीने विक्रीत ऑगस्टमध्ये चारपट वाढ (5 हजार 104 दुचाकी) नोंदवली आहे. हिरो इलेक्ट्रिकच्या 10 हजार वाहनांची विक्री झाली आहे. याआधी एप्रिलमध्ये सर्वाधिक 13 हजार दुचाकींची विक्री करण्यात आली होती.