‘ग्लोबल नानी’ला जगभरातून मिळतात ऑर्डर
चंदीगड येथे राहणाऱया 96 वर्षीय हरभजन कौर यांना लोक प्रेमाने ‘नानी’ म्हणतात. हरभजन यांनी तयार केलेली बर्फी तसेच लोणच्याचे चाहते देशातच नव्हे तर जगभरात आहेत. याचमुळे नानी आता ‘ग्लोबल नानी’ ठरली आहे.
स्वादाचा हा प्रवास 6 वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी सुरू केला होता. स्वतःचे जीवन नेहमीच दुसऱयाच्या मदतीने जगल्याची खंत होती. कधीच स्वतःचे पैसे कमाविले नसल्याचे वाटत असताना मुलगी रविना सूरीने बर्फी आणि लोणचे तयार करून विकण्याची सूचना केली. मग 5 किलोग्रॅम बेसनची बर्फी आणि टॉमेटो चटणी तयार करून बाजारात विकण्यासाठी गेले, तेथे काही तासातच सर्व सामग्री विकली गेल्याचे हरभजन यांनी सांगितले.
त्या दिवशी नानीचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या स्वतःच्या जीवनातील पहिल्या कमाईने अत्यंत आनंदी होत्या असे त्यांची नात मल्लिका सूरीने सांगितले. हरभजन यांनी कमाविलेले 3 हजार रुपये स्वतःच्या मुलींमध्ये वाटून टाकले. यामुळे त्या प्रोत्साहित देखील झाल्या आणि त्यानंतर त्यांनी बर्फी आणि लोणचे तयार करण्यास सुरुवात केली. घरातील सदस्यांनीही त्याला साथ दिली. त्या अनेक प्रदर्शनांमध्ये सहभागी होत बर्फी-लोणच्याचे स्टॉल लावू लागल्या. यामुळे त्यांना लोकांदरम्यान ओळख मिळाली. मग कुटुंबीयांनी ऑनलाईन विक्रीचा मार्ग स्वीकारण्याची योजना आखली.
बालपणीच्या आठवणी नानीच्या हातचे खाद्यपदार्थ आता घरातल्या लोकांसोबत बाहेरच्या लोकांनाही आवडू लागले आहेत. नानी सर्व खाद्यपदार्थ घरातच तयार करत असल्याने आम्ही बाहेरचे फारसे खात नव्हतो. अशा स्थितीत नानीने तयार केलेल्या गोष्टी ऑनलाईन विकण्याचा निर्णय घेतल्यावर त्याची टॅगलाइन ‘बालपणीच्या आठवणी’ ठेवली. आता नानीला सातत्याने ऑर्डर्स मिळत असल्याचे मल्लिका सांगते