चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
बेळगाव : चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या कॅन्टोन्मेंट शाळेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंट शाळेच्या विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिप मिळविली आहे. यापूर्वी अहमदाबाद आणि बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत दोनवेळा चॅम्पियनशिप मिळविली होती. आता तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप मिळवून शाळेच्या विद्यार्थ्यांनी हॅट्रीक साधली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरवर्षी विविध कॅन्टोन्मेंट परिसरात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. 2014 मध्ये बेळगावमध्ये शाळेच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करून चॅम्पियनशिप मिळविली होती. त्यानंतर अहमदाबाद येथे 2019 मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून चॅम्पियनशिप खेचून आणली होती. आता तिसऱ्यांना चेन्नई येथील स्पर्धेतखो-खो, कबड्डी व्हॉलिबॉल, अॅथलेटीक्स, लांब ऊडी, अशा विविध स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवुन चॅम्पियनशिप मिळविली आहे. यामध्ये विद्यार्थीनिंनी सर्वाधिक स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. खो-खो, कबड्डी आणि व्हॉलिबॉल या तिनही स्पर्धांमध्ये विद्यार्थीनिंनी पहिला क्रमांक पटकाविला आहे. व्हॉलिबॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेत मुलांनी पहिला आणि दुसरा क्रमांक व विद्यार्थीनिंनी पहिला क्रमांक पटकाविला. 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत विद्यार्थी आणि विद्यार्थीनिंनी पहिल्या क्रमांकाचे मानांकन मिळविले. 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक विद्यार्थ्यांनी पटकाविला. त्याचप्रमाणे 100 मी. रिलेमध्ये मुलांनी पहिला क्रमांक तर मुलींनी चौथा क्रमांक मिळविला. 4 बाय 4 100 मीटर रिलेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थीनिंनी चौथा क्रमांक मिळविला. गोळाफेकमध्ये चौथा क्रमांक विद्यार्थी व विद्यार्थीनिंनी मिळविला. तसेच लांब उडीमध्ये दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी बाजी मारली. व्हॉलिबॉलमध्ये एका मुलांनी आणि कबड्डी आणि खो-खो स्पर्धेत दोन मुलींनी बेस्ट प्लेअरचे पारितोषिक मिळविले. शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक तसेच कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद के आणि कार्यालयीन अधिक्षक एम. वाय. ताळूकर यांचे प्रोत्साहन लाभले. सदर विजेत्या विद्यार्थ्यांना डायरेक्टर ऑफ जनरल डिफेन्स इस्टेटचे अजयकुमार शर्मा व प्रिन्सिपल डायरेक्टर के. जे. एस. चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद व इतर मान्यवर उपस्थित होते.