लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन: शाहू मिलमध्ये प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते फित कापून केले. पवार यांनी इलेक्ट्रीक कारमध्ये बसून छायाचित्र प्रदर्शन पाहून प्रदर्शनाचे कौतुक केले. या कारचे सारथ्य पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी शाहू मिलमधील प्रस्तावित स्मारकाची माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. तसेच या स्मारकासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी महापालिकेच्या वतीने पवार यांच्याकडे केली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 22 मेपर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत पाहण्यासाठी खुले राहणार आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरूण लाड, आमदार जयंत आसगावकर, नागपूरचे माजी आमदार प्रकाश गजबीये, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये शाहू मिलचे उद्घाटन, शाहू महाराज यांच्या आठ घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या खडखडय़ातील प्रवास, शाहू महाराज यांच्या वापरातील मोटार गाड्य़ांच्या कारखान्यातील चालकांबरोबरचे छायाचित्र, बहाबळेश्वर येथील शाहू महाराज यांचा क्रेग बंगला, नर्सरी बागेतील शाहू समाधीस्थळ, तुकोजीराव पवार, राजेसाहेब देवास यांच्याबरोबरचे शाहू महाराज यांचे छायाचित्र, कोल्हापुरातील रेसकोर्स, साठमारी, शाहू क्रिकेट क्लबचे खेळाडू, भास्करराव जाधव, दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे, प्रबोधनकार के. सी. ठाकरे, व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग, सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राम्हण बोर्डींग पायाभरणी समारंभ, हुबळी कर्नाटक येथे ब्राह्मणेत्तरांची कर्नाटक ब्राह्मणेत्तर परिषद, शाहूकालीन इरिगेशन प्रकल्प, राधानगरी धरण, रेल्वेस्टेशन अशा अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शाहू प्रेमींची गर्दी झाली होती. या प्रदर्शनात शाहूकालीन कोल्हापुरचा अवघा इतिहासच अवतरला आहे. प्रदर्शनाचे आयोजन इतिहास संशोधक डॉ. इंद्रजीत सावंत, उदय गायकवाड, अमरजा निंबाळकर, देविकाराणी पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, आदींनी केले आहे.
शाहू मिलमध्ये बचत गटांचे स्टॉल
शाहू मिलची स्वच्छता, रंगरंगोटी करून चकाचक केली आहे. येथे महिला बचत गटांचे स्टॉल लागले आहेत. थालीपीठ, पुरणपोळी, फळे, शेवया, पापड, ज्युस, चहा, वडापावच्या स्टॉलवर खवैय्यांनी गर्दी केली होती.