वृत्तसंस्था/ गॅले
सध्या आयर्लंडचा संघ लंकेच्या दौऱ्यावर असून उभय संघातील रविवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत यजमान लंकेने पहिल्या डावात 4 बाद 386 धावा झळकवल्या. लंकेच्या डावात कर्णधार दिमूथ करुणारत्ने आणि कुशल मेंडिस यांनी शानदार शतके झळकवली.
लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार करुणारत्ने आणि मधुशेका या सलामीच्या जोडीने 64 धावंची भागीदारी केली. मधुशेका बाद झाल्यानंतर करुणारत्नेला कुशल मेंडिसकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 281 धावांची भागीदारी केली. डॉक्रेलने कुशल मेंडिसला पायचित केले. मेंडिसने 193 चेंडूत 1 षटकार आणि 18 चौकारासह 140 धावा झळकवल्या. त्यानंतर आयर्लंडच्या व्हाईटने मॅथ्यूजला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी अॅडेरने करुणारत्नेला झेलबाद केले. त्याने 235 चेंडूत 15 चौकारासह 179 धावा झोडपल्या. दिवसअखेर चंडिमल 18 तर पी. जयसुर्या 12 धावावर खेळत आहे. आयर्लंडतर्फे अॅडेर, कॅम्फर, व्हाईट आणि डॉक्रेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
लंका प. डाव 88 षटकात 4 बाद 386 (करुणारत्ने 179, कुशल मेंडिस 140, मधुशेका 29, मॅथ्यूज 0, चंडिमल खेळत आहे 18, जयसुर्या खेळत आहे 12, अवांतर 8, अॅडेर, कॅम्फर, व्हाईट, डॉक्रेल प्रत्येकी एक बळी).