केरळच्या राज्यपालांनी उचलले पाऊल
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत करण्यात आलेली एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या पार्श्वभूमीवर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्यातील 9 विद्यापीठांच्या कुलगुरुंना सोमवार सकाळी 11.30 वाजेपर्यंत राजीनामा देण्यास सांगितले आहे.
राजीनामा द्यावा लागणाऱया 9 कुलगुरुंमध्ये एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु सामील असल्याची माहिती केरळ राजभवनने एक ट्विट करत रविवारी दिली आहे. उच्च न्यायालयाचा 21 ऑक्टोबरचा आदेश पाहता राज्यपालांनी 9 विद्यापीठाच्या कुलगुरुंना राजीनामा देण्याचा निर्देश दिला असल्याचे यात नमूद आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगानुसार राज्याकडून स्थापन शोध समितीने कुलगुरु पदासाठी इंजिनियरिंग क्षेत्राशी संबंधित प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाची शिफारस करणे अपेक्षित होते. परंतु समितीने केवळ एकाच नावाची शिफारस केली होती असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने कुलगुरु डॉ. राजश्री एम.एस. यांची नियुक्ती रद्द केली होती.