पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील गुणांच्या आधारे सर्वाधिक गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड संबंधित संस्थेने करण्याची तरतूद आहे. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षण सेवक निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली असून, प्रत्येक रिक्त जागेच्या मुलाखतीसाठी 1:10 प्रमाणाऐवजी आता 1:3 यात प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठीची मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार केली जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांतील शिक्षण सेवकांची रिक्त पदे भरताना उमेदवारांनी निवडीची समान संधी मिळण्यासाठी, उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील गुणांच्या आधारे भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशाला अनुसरून 1:10 या प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार टाळणे, गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यात 1:10 या प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी उपलब्ध करून देण्याच्या तरतुदीमुळे अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खासगी संस्थांचे शिक्षक निवडीचे आणि नियुक्तीचे अधिकार अबाधित ठेवून भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात प्रत्येक रिक्त जागेच्या मुलाखतीसाठी 1:10 प्रमाणाऐवजी आता 1:3 या प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले.
या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राधान्यक्रम, गुणानुक्रम, पदासाठी माध्यम, प्रवर्ग, विषय, बिंदूनामावलीनुसार सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांची निवडसूची संबंधित शिक्षण संस्थेच्या ऑनलाइन खात्यात उपलब्ध करून देण्यात येईल. संबंधित उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत आणि अध्यापन कौशल्याद्वारे तीस गुणांसंदर्भात उमेदवारांचे गुणपत्रक आणि निकाल संस्थेला पवित्र प्रणालीवर जाहीर करावा लागणार आहे. तसेच त्या आधारे पवित्र प्रणालीवर शिफारस केलेले आरक्षण आणि विषय लक्षात घेऊन सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करायची आहे. मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी निश्चित केलेल्या तीस गुणांसंदर्भात शिक्षण आयुक्तांनी मानक कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.