वृत्तसंस्था /चेन्नई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे यजमान चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होत आहे. या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सचे आगमन होत असल्याने चेन्नईचा संघ अधिक भक्कम झाल्dयाचे जाणवते. या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत गेल्या पाचपैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने गमवित स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवले आहे. तर हैदराबाद संघाने आतापर्यंत पाचपैकी 2 सामने जिंकले असून 3 सामने गमवले असून ते 4 गुणासह शेवटून दुसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या काही दिवसापासून अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स या स्पर्धेतील चेन्नईच्या गेल्या तीन सामन्यात खेळू शकला नव्हता पण बुधवारी तो नेटमध्ये सरावात सहभागी झाला होता. त्याची ही दुखापत बरी झाली असून तो शुक्रवारच्या सामन्यात खेळणार असल्याने चेन्नईचा संघ अधिक बलवान राहिल. सनरायजर्स हैदराबादला यापूर्वीच्या मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. चेन्नईची फलंदाजी बऱ्यापैकी बहरत असल्याचे दिसून येते. अजिंक्य रहाणे, कॉन्वे, शिवम दुबे तसेच गायकवाड यांच्या फलंदाजीत सातत्य असल्याने चेन्नईला शुक्रवारच्या सामन्यात कदाचित मोठी धावसंख्या रचण्याची संधी मिळू शकेल. हा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने साहजिकच चेन्नईला त्याचा लाभ अधिक होईल. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांना अधिक सुधारित गोलंदाजी करावी लागेल. चेन्नई संघातील फिरकी त्रिकुट रविंद्र जडेजा, मोईन अली आणि थीक्षणा हे हैदराबादला डोकेदुखी ठरू शकेल.
सनरायजर्स हैदराबादचा संघ गेल्या काही सामन्यामध्ये मोठी धावसंख्या रचण्यासाठी झगडत आहे. त्यांच्या फलंदाजीत सुधारणा होणे जरुरीचे आहे. कर्णधार मार्करम, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रुक यांच्याकडून अधिक धावा जमवण्याची गरज आहे. सनरायजर्स हैदराबादचा संघ गेल्या सामन्यामध्ये पॉवरप्ले दरम्यान आपले फलंदाज गमवले होते. या संघाला ब्रायन लारा प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभला आहे. सामना जिंकण्यासाठी हैदराबाद संघाची मधली फळी खेळणे जरुरीची आहे. हैदराबाद संघातील राहुल त्रिपाठी आणि ब्रुक यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदर भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, आदिल रशीद, मयांक मार्कंडे हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. मयांक अगरवाल तसेच जान्सेन यांची वैयक्तिक कामगिरी होणे जरुरीचे आहे. मात्र शुक्रवारच्या सामन्यात हैदराबादच्या तुलनेत चेन्नईचे पारडे निश्चित जड वाटते.