वृत्तसंस्था/ दुबई
रविवारी येथे झालेल्या 22 व्या दुबई खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर अरविंद चिदंबरमने 7.5 गुणांसह विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत गुणतक्त्यात पहिल्या दहा बुद्धिबळपटूंमध्ये भारताच्या सात स्पर्धकांचा समावेश होता. भारतीय ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदने दुसरे स्थान मिळविले.
ही स्पर्धा नऊ फेऱयांमध्ये घेण्यात आली. शेवटच्या फेरीमध्ये 22 वषीय चिदंबरम आणि प्रग्यानंद यांच्यातील लढत बरोबरीत राहिली. या लढतीमध्ये दोन्ही भारतीय बुद्धिबळपटूंना प्रत्येकी अर्धा गुण मिळाला. त्यामुळे चिदंबरमने 7.5 गुणांसह स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेमध्ये भारताच्या पाच बुद्धिबळपटूंनी प्रत्येकी समान 7 गुणांसह संयुक्त दुसरे स्थान मिळविले. पण टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंद उपविजेता ठरला. 13 वा मानांकित तसेच भारताचा माजी राष्ट्रीय विजेता चिदंबरम या स्पर्धेत शेवटपर्यंत अपराजित राहिला. त्याने 6 डाव जिंकले असून 3 डाव बरोबरीत राखले. भारताच्या अभिजीत गुप्ता, जयकुमार शेटय़े आणि एस. पी. सेतुरामन यांनीही प्रत्येकी 7 गुण मिळविले. मियामी येथे झालेल्या एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या प्रग्यानंदने अग्रमानांकित मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता. त्याने या स्पर्धेत सलग चार डाव जिंकले. पण त्याला कझाकस्तानचा ग्रॅण्डमास्टर जुमाबायेव्हकडून हार पत्करावी लागली होती. या स्पर्धेत भारतीय ग्रॅण्डमास्टर हर्षा भरतकोटीला गुणतक्त्यात दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.