सापाचे विष विकणारा देशातील सर्वात मोठा ड्रग माफिया एल्विश यादव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आल्यावर त्याच्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच त्याच्याकरवी गणेश आरतीही कऱण्यात आली. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बंगल्यावर कोणकोण येतं याची माहीती नाही का? असा सवाल करून महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेट मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताने चालवले जात आहे का? असाही प्रश्न खासदार संजय राऊत विचारला आहे.
यूट्यूबर एल्विश यादव या बिग बॉसचा विजेत्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष वापरून नशा केल्याचा आरोप होत असून त्याच्यावर दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे. त्याचे सापाबरोबरचे काही फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले. गणेशोत्सव काळात त्याने मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हजेरी लावून त्यांच्या उपस्थितीमध्ये गणपतीची आरती केली होती.
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी हाच मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पूजेसाठी का बोलावले, असा सवाल केला. तसेच “मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आता गुन्हेगारांचे पर्यटनस्थळ झाले आहे का? एल्विश यादव सारख्या युट्युबरला ज्यावर सापाचे औषध देऊन रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याचा आरोप आहे, त्याला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पूजेसाठी खास आमंत्रित करण्यात आले होते.” असे म्हणून अतुल लोंढे यांनी एल्विश यादव याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरती करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, “या देशातील सगळ्यात मोठा ड्रग माफिया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निवासस्थानावर येतो. त्याचं मोठं स्वागत केलं जातं. त्याच्याहस्ते गणपती आरती केली गेली. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा ड्रगचा व्यापार चालु आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना याची कल्पना नाही काय ? मुख्यमंत्र्याचे राजकिय संबंध या ड्रग माफियांशी आहेत काय ? मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्वीश यादवला घेऊन येणारा तो खासदार कोण ? याचे उत्तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना द्यावे लागेल.” असे त्यांनी म्हटले आहे.