कथित प्रक्षोभक भाषण प्रकरणी चालणार नाही खटला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रक्षोभक भाषण प्रकरणी खटला चालविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात 2007 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री योगींच्या विरोधात प्रक्षोभक भाषणाच्या आरोपाप्रकरणी खटला चालविण्याची अनुमती देण्यास नकार दिला आहे. यापूर्वी राज्य सरकारने मे 2017 मध्ये हा खटला चालविण्याची अनुमती देण्यास नकार दिला होता. या प्रकरणी पुरावे पुरेसे नाहीत असे सरकारने म्हटले होते. सरकारचा हा दावा अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2018 मध्ये योग्य ठरविला होता.
याचिकेत काहीच ठोस नसल्याने हा खटला चालविण्याची मंजुरी दिली जाऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. गोरखपूर दंगलीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने योगींच्या कथित भाषणाची चौकशी करविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.
नोव्हेंबर 2008 मध्ये ही याचिका पहिल्यांदा दाखल करण्यात आली होती. यात योगी आदित्यनाथ यांच्या कथित भाषणामुळेच दंगली झाल्याचा दावा करण्यात आला होता. ही याचिका मोहम्मद असद हयात आणि परवेझ यांच्याकडून दाखल करण्यात आली होती. या दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दंगलीच्या काळात योगी आदित्यनाथ हे गोरखपूरचे खासदार होते.