बेशिस्त पार्किंग-वाहनचालकांचा मनमानी कारभारामुळे समस्या
बेळगाव / प्रतिनिधी
दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. करण्यात आलेले बेशिस्त पार्किंग व वाहनचालकांचा मनमानी कारभार यामुळे शहराच्या सर्वच भागात वाहतूक कोंडी होते. किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, काकतीवेस, रविवारपेठ रोड, खडेबाजार शहापूर या परिसरात शनिवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे बऱयाचशा वाहनचालकांना तासन्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
कडोलकर गल्ली, बुरूड गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली या गल्ल्यांमध्ये फेरीवाले आपल्याला हवे त्या ठिकाणी थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यातच काही अरूंद गल्ल्यांमध्ये चारचाकी वाहन आल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागत होत्या. यामुळे बाजारात खरेदीपेक्षा वाहतूक कोंडीतच अर्धा वेळ जात होता. कलमठ रोड येथेही मोठय़ा वाहनांसोबत लहान वाहनेही अडकून पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
संभाजी चौकात चारचाकी वाहने अडविण्याची गरज
शनिवारी खरेदीसाठी बाजारात गर्दी होणार हे माहिती असतानाही सर्वच वाहने मुख्य बाजारपेठेपर्यंत जाऊ देण्यात येत होती. गोव्यामधून येणाऱया बऱयाचशा नागरिकांना अंतर्गत रस्ते माहित नसल्यामुळे अरूंद गल्ल्यांमध्ये चारचाकी वाहने अडकून पडली. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याऐवजी धर्मवीर संभाजी चौकापासून चारचाकी वाहनांना प्रवेश बंद केला असता तर शहराच्या मध्यवर्ती भागात झालेली वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी करण्यास मदत झाली असती.