मूसेवालाच्या नावावर कॅन्सर रुग्णालय स्थापन करणार
वृत्तसंस्था/ मानसा
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येच्या 5 दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे त्याच्या घरी पोहोचले. यादरम्यान मूसेवालाच्या कुटुंबीयांची भेट घेत मान यांनी त्यांचे सांत्वन केले आहे. मूसेवालाच्या नावावर एक स्टेडियम आणि कॅन्सर रुग्णालय स्थापन करण्याचे आश्वासन मान यांनी यावेळी त्याच्या कुटुंबीयांना दिले आहे. तसेच दोषींना शिक्षा मिळवून देऊ असे त्यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री मान यांच्या दौऱयाला विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा काढून घेतल्यानेच मूसेवालाची हत्या झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. सरदूलगढचे आमदार गुरप्रीत सिंह यांनाही ग्रामस्थांनी विरोध पेला.
सिद्धूच्या नावावर एक कॅन्सर रुग्णालय निर्माण केले जाईल. तसेच राज्यात मूसेवालाच्या नावावर एक स्टेडियम उभारण्यात येणार आहे. सिद्धू मूसेवाला एक जात, धर्म किंवा एका क्षेत्रापुरती मर्यादित नव्हता. तो एक लिजेंड होता, केवळ पंजाबच नव्हे तर पूर्ण देशातील लोक त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते असे उद्गार मान यांनी यावेळी काढले.
राजकारण होऊ नये
मूसेवालाच्या हत्येप्रकरणी कुठलेच राजकारण होऊ नये असे मान यांनी मानसा दौऱयादरम्यान म्हटले आहे. भगवंत मान यांच्या दौऱयापूर्वी मूसा गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मान यांच्या दौऱयापूर्वी मूसेवालाच्या घरी पोहोचलेले आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत सिंह यांना लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागले होते. निदर्शकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या.
29 मे रोजी पंजाबच्या मानसामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी सिद्धू मूसेवालाची गेळय़ा झाडून हत्या केली होती. राज्य सरकारकडून मूसेवालाच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याच्या दुसऱया दिवशी ही घटना घडली होती.