वार्ताहर /हरमल
भटवाडी येथील लिजवर दिलेल्या जमिनीचा करार आठ महिन्यांपूर्वी संपला आहे. तरीही त्या जमिनीत वास्तव्यास असलेल्या एका इसमाने दिल्लीच्या गुंडाकरवी मारहाण व धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार भटवाडी वरचावाडा येथील बाबुराव मांद्रेकर यांनी हरमल पोलीस चौकीत दिली आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भटवाडी वरचावाडा येथील बाबुराव मांद्रेकर यांनी दुनागिरी फाऊंडेशनसाठी 277/5 मधील 6 हजार चौ.मी. जमिनीपैकी 2500 चौ मी.चा भाग 2014 साली लिजवर दिल्लीस्थित नागरिकास दिली होती. दरम्यान मध्यंतरी ठरल्यानुसार पैसे बँक खात्यात जमा न झाल्याने, मांद्रेकर यांनी कायदेशीर बाबी पडताळून नोटीस व नंतर 2021 साली लीज प्रक्रिया रद्द करून त्या जमिनीचा ताबा स्वत:कडे घेतला. त्याच दरम्यान संबंधित इसमाने पूर्वनियोजित एका इव्हेंटचे आयोजन केले होते व ताबा सोडतेवेळी पोलिसांसमोर विनवणी केल्याने व पोलिसांनी तत्वत: मान्य केल्याने, आपण सदर जागा आठ दिवसांच्या अटीवर देण्यास राजी झालो, मात्र सध्या आपल्याचा त्याचा त्रास होत आहे, मांद्रेकर यांनी सांगितले.
गुरुवारी 16 रोजी संध्याकाळी 5.30 वा. आपण सर्व्हे नंबर 277/4 मधील विठ्ठल नार्वेकर यांच्या जमीन बागायतीतील साफसफाई करण्यास गेलो होतो. त्याठिकाणी एका इसम अंगावर धावून आला तसेच आपल्या मुलास धक्का देऊन मानेवर हातोडा मारण्याचा प्रयत्न केला व मान दाबून धरली. तसेच आपल्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे आपल्या कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. संबंधिताने विवेक देवाण (दिल्ली) नामक इसम धमकी देतानाचा व्हिडीओ असल्याचे मांद्रेकर यांनी पत्रकारांना सांगितले.दरम्यान, आपल्या मुलगा अनिश बाबुराव मांद्रेकर याची तुये इस्पितळात वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या मानेला मुका मार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सांगितले. दरम्यान या प्रकरणी हरमल पोलीस आऊट पोस्टमध्ये हवालदार महेश नाईक यांच्याकडे लेखी तक्रार दिल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संबंधित इसमास अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.