पहिल्या टप्प्यातील मार्ग जोडला : डिसेंबरपूर्वी वाहतुकीस खुला होणार
प्रतिनिधी /वास्को
झुआरी नदीवरील नवीन पुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामातील एक मार्ग मंगळवारी दुपारी जोडण्यात आला. हा पूल जोडताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल उपस्थित होते. दक्षिण व उत्तर गोव्याला हा पूल जोडताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरोहिताच्या साक्षीने धार्मिक विधीही पार पाडण्यात आले. हा पूल येत्या डिसेंबरपूर्वी वाहतुकीस खुला करण्यात येईल असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री व साबांखामंत्र्यांनी मार्च 2025 पर्यंत या पुलाचा दुसरा टप्पाही पूर्ण होऊन दुसरा मार्गही वाहतुकीस पूर्णपणे खुला करण्यात येईल, असे जाहीर केले. बोरी येथे झुआरी नदीवर नवीन पूल बांधण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
झुआरी नदीवरील नवीन पूल आठपदरी आहे. पैकी पहिल्या टप्प्यातील चार पदरी पूल आता जवळपास पूर्ण झालेला आहे. पणजीहून मडगावच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला असलेला हा चौपदरी पूल शेवटचा भाग कमानीवर चढवून तो जोडण्याचा महत्त्वपूर्ण क्षण मंगळवारी दुपारी पार पडला. यानिमित्त दिलीप बिल्डकॉन या बांधकाम कंपनीतर्फे विशेष सोहळय़ाचे आयोजन आगशीच्या किनाऱयावर करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रमुख दिनेश गुप्ता, गोवा सरकारचे प्रमुख अभियंता उत्तम पार्सेकर, दिलीप बिल्डकॉनचे उपाध्यक्ष अतुल जोशी, उपप्रकल्प व्यवस्थापक देवगौडा पाटील व मान्यवर उपस्थित होते. गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खाते, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खाते तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मार्च 2025 पर्यंत पुलावरील दुसरा मार्गही वाहतुकीस खुला होणार
या मान्यवरांच्या उपस्थितीत शेवटची कमान चढवून हा पूल जोडण्यात आला. आता या पुलावरील रस्त्याचे काम, पुलाचे कठडे, वीजव्यवस्था व इतर आवश्यक सोयी पूर्ण करण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या डिसेंबरपूर्वी नवीन पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी म्हटले आहे. आठपदरी नवीन पुलापैकी पहिल्या चार पदरी पुलाचे काम पूर्ण झालेले असून मार्च 2025 पर्यंत दुसरा चौपदरी पूल पूर्ण होईल व हासुद्धा पूल वाहतुकीस खुला होईल, असे मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी झुआरीवरील बोरीच्या पुलाबाबतही भाष्य करताना बोरीसाठी नवीन पूल बांधण्यासाठीही नियोजन करण्यात आलेले असल्याचे स्पष्ट केले.
नवीन पूल जोडणी गोव्याच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोव्याच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. झुआरीवरील नवीन पूल जोडला गेल्याने महत्त्वाचे कार्य पूर्ण झालेले आहे. आता या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होणार आहे. हा पूल तयार होणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय भूपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न आहे. ते पूर्ण होणार आहे. हा देशातील दुसऱया क्रमांकाचा सर्वात लांब केबल स्टेड पूल असून पूल वाहतुकीस खुला करताना महत्त्वपूर्ण उद्घाटन सोहळा होईल व या सोहळय़ाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व इतर केंद्रीय नेते उपस्थित राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. या पुलावरच उंच मनोऱयावर पुढे उपहारगृह उभारले असून ते पर्यटकांचे आकर्षण ठरेल आणि गोव्यासाठी हा गर्वाचा प्रकल्प ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. 2014 पासून गोव्यात झपाटय़ाने विकास झालेला आहे. यापूर्वी अटल सेतूही पूर्ण झालेला आहे. गेल्या आठ वर्षांत गोव्यात साधनसुविधांच्या विकासासाठी 22 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीन गडकरीसारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांमुळे हा विकास झालेला आहे. मला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या विकासाचा अभिमान वाटतो. देशात सर्वत्रच विकास होत आहे. सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू आहे. या काळात देशात आणि गोव्यातही आणखी विकास पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पुरोहिताचा मार्गदर्शनाखाली पूल जोडणीनिमित्त धार्मिक विधी करण्यात आले.
पुलावरील उपहारगृहाचा प्रकल्प पीपीपीतत्त्वावर उभारला जाणार
साबांखामंत्री नीलेश काब्राल यांनी यावेळी नवीन पूल जोडण्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना बऱयाच काळानंतर हे यश प्राप्त करणे शक्य झाल्याचे सांगितले. हा पूल आदर्शवत ठरेल, असे ते म्हणाले. या पुलावरील मनोऱयावर उपहारगृह उभारण्यात येणार आहे. मात्र, तो या प्रकल्पाचा भाग नाही. त्यासाठी वेगळय़ा निविदा काढण्यात येतील. पीपीपीतत्त्वावर तो प्रकल्प उभारण्यात येईल, अशी माहिती मंत्री काब्राल यांनी दिली.
खुला झाल्यानंतर बांबोळी ते वेर्णा थेट प्रवास
मंगळवारी झुआरी नदीवर जोडण्यात आलेला व नवीन केबल स्टेड पुलाचा भाग असलेला बांबोळी ते आगशीपर्यंतचा जोड रस्ता यापूर्वीच वाहतुकीस खुला झालेला आहे. मात्र, वेर्णा ते कुठ्ठाळीपर्यंतचा या पुलाचा जोड रस्ता पूर्ण होऊनही तो अद्याप वाहतुकीसाठी खुला झाला नव्हता आता पुलाच्या इतर कामांच्या पूर्णत्वानंतर वेर्णा ते थेट बांबोळी असा हा महामार्ग वाहतुकीस खुला होणार आहे. बांबोळी ते आगशी व्हाया शिरदोनच्या उड्डाण पुलासह हा महामार्ग जवळपास साडे सात किलो मिटर लांब आहे. तर वेर्णा ते आगशीपर्यंत हा महामार्ग 6 किलो मिटरहून अधिक आहे. या मार्गावरील झुआरीचा नवीन पूल 640 मिटर लांब आहे.