ऑनलाईन टीम/तरुण भारत
पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्यासह अन्य दोन पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे दौंड न्यायलयाचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. शिरगावकर यांच्यासह यवतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माराज गंपले आणि राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पोलिस विभागात एकच खळबळ माजली आहे.
यासंदर्भात आरती शरद लव्हटे (घरकुल सोसायटी, पाथरेवस्ती, लोहगाव पुणे) व किरण शांताराम भोसले (जोगवडी, पोस्ट मावडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी न्यायालयात धाव घेतली होती. जमीनीच्या एका प्रकरणात पोपट उर्फ कैलास तावरे याच्याविरोधात यवत पोलिस ठाण्यात आरती लव्हटे व किरण भोसले यांनी २०२१ मध्ये तक्रार दिली होती. यामध्ये यवत पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता.
दरम्यान, अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन खरेदी-विक्री प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते पोपट तावरे यांना मदत करणे पोलिसांना भोवले आहे. पोपट तावरे यांची किरण शांताराम भोसले आणि आरती लव्हटे यानी यवत पोलिसांनाकडे तक्रार केली होती. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे यातील मुख्य आरोपी असलेल्या पोपट तावरे यांस क्लीन चीट दिली होती. आणि या गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही असं न्यायालयास दर्शविले होते. परंतु, पोपट तावरे हे खरेदीदार असतानाही हेतूपूर्वक त्यांना बाजूला ठेवण्यासाठी संबंधित आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी खोटे कागदपत्रे न्यायालयात सादर केली. याबाबत फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली होती.