16 मार्चच्या सुनावणीवेळी हजर राहण्याचे निर्देश : ईडीच्या दुसऱ्या तक्रारीची दखल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढू शकतात. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तक्रारीवरून दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने गुऊवारी अरविंद केजरीवाल यांना 16 मार्चला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. ईडीच्या 8 समन्सनंतरही दिल्लीचे मुख्यमंत्री तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर ईडीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने यापूर्वीच केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सुरुवातीला पाचव्या समन्सनंतर ईडीने तक्रार दाखल केल्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले होते. त्यांना 17 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे पुढील तारखेला हजर राहतील, असा युक्तिवाद करत वैयक्तिक हजेरीतून सूट मिळविली होती. त्यानंतर आता ईडीच्या दुसऱ्या तक्रारीनंतर न्यायालयाने पुन्हा एकदा केजरीवाल यांना 16 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश जारी केले आहेत. केजरीवाल यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी पुढील आठ दिवसात ते कोणता पवित्रा घेतात हे पहावे लागेल. ईडीने केजरीवाल यांना 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर, 3 जानेवारी, 17 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारीला समन्स पाठवले होते. मात्र ते एकदाही तपास यंत्रणेसमोर हजर झालेले नाहीत. या काळात ईडीने त्याच्याविऊद्ध दोनदा न्यायालयात तक्रार केली आहे. केजरीवाल यांनी ईडीच्या आठव्या समन्सला उत्तर देताना ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. तरीही आपण एजन्सीच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचदरम्यान न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले तरच अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहू, असेही त्यांनी सांगितले होते.