प्रतिनिधी/ वास्को
चीनमध्ये कोविडचे पुन्हा थैमान सुरू झाल्याने केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार देशभरातील विमानतळांवर विदेशी प्रवाशांबाबत सतर्कता पाळणे सुरू झालेले आहे. दाबोळी विमानतळावरही काल शनिवारी संध्याकाळपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या कोविड तपासणीला सुरुवात झालेली आहे. मात्र, या विमानातील दोन टक्केच प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.
चीनसह जपान, कोरिया, हाँगकाँग, थायलॅण्ड व इतर युरोपीय देशातील हवाई प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी व चाचणी सकारात्मक निघाल्यास कॉराईन्टाईन सक्तीचे करण्यात आलेले आहे. मात्र, नमूद केलेल्या देशातून दाबोळी विमानतळावर विमानांचे थेट आगमन होत नाही. त्यामुळे दाबोळी विमानतळावर चीन, जपान, कोरिया व इतर देशांतून येणाऱया प्रवाशांचे दडपण राहणार नाही. तसेच दाबोळी विमानतळावर थेट उतरणाऱया विदेशी विमानांचा त्या देशांशी जवळचा सबंध नाही. परंतु तरीही खबरदारी म्हणून दाबोळी विमानतळावर उतरणाऱया प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानातील दोन टक्के प्रवाशांची कोविड चाचणी होणार आहे. ही कार्यवाही काल शनिवारी संध्याकाळपासूनच सुरू झाल्याचे दाबोळी विमानतळाचे संचालक धनजंय राव यांनी म्हटले आहे.